मुंबई
amitabh bachchan बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण झाली आहे. वयाच्या ८४व्या वर्षीही कामात सक्रिय असलेल्या बिग बी यांनी सध्या काहीही लिहिण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगत चाहत्यांची माफी मागितली आहे. डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांती घेऊन प्रकृतीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी नमूद केले.
बुधवारी अमिताभ बच्चन यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपली सद्यस्थिती स्पष्ट केली. विश्रांती घेऊन बरे होण्यासाठी काही दिवस थांबण्याचा सल्ला मिळाल्याने सध्या लिहिणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. बिग बी नियमितपणे सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या या पोस्टची विशेष चर्चा होत आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने लिहिलेल्या ब्लॉगमध्येही अमिताभ बच्चन यांनी प्रकृतीसाठी कठोर विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगितले होते. सध्या संवाद साधण्याची परवानगी नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी चाहत्यांनी गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती केली. पुढील काळात पुन्हा संवाद साधता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून चित्रपटांच्या कामातही सक्रिय आहेत. अलीकडेच त्यांनी ‘केबीसी’च्या मंचावर चित्रीकरणादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती दिली होती. मात्र, सध्याच्या विश्रांतीच्या सल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहितीची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.