पोलिसांना वारंवार गुंगारा देणारा कुख्यात चोर अटकेत

वाहनचोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल कपिलनगर पोलिसांची कारवाई

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Notorious thief arrested शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गस्त आणि तपासाची मोहीम राबविणाऱ्या कपिलनगर पोलिसांनी वाहनचोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल केली आहे. हा चोर शहरभरात दुचाकी चोरुन पोलिसांच्या नाकी नऊ आणत होता. मात्र, कपिलनगर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईत एकूण नऊ दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची किंमत सुमारे ६ लाख ३० हजार रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सुगत नगर परिसरातील बुद्धविहाराजवळ भाजीपाला विक्रीसाठी गेलेल्या तक्रारदाराची निळ्या रंगाची होंडा अॅक्टिव्हा (एमएच-३१-जीबी-६११४) चोरीला गेली होती. तक्रारदाराने वाहन नेहमीप्रमाणे दुकानासमोर उभे केले होते. काही वेळाने ते वाहनाजवळ गेले असता अॅक्टिव्हा दिसून आली नाही. याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश आडे यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणे सुरु केले.
 
 
 
ty6576768789
 
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला संशयित आरोपींच्या ताब्यातून चोरीची अॅक्टिव्हा आढळली. चौकशीत संबंधित वाहन कपिलनगर परिसरातून चोरल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पुढील तपासात नागपूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेली आणखी वाहने हस्तगत करण्यात आली. या कारवाईत कपिलनगर, जरीपटका, सक्करदरा, मानकापूर आणि अंबाझरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले. जप्त वाहनांमध्ये होंडा अॅक्टिव्हा, बुलेट ३५०, स्प्लेंडर आणि हिरो डिलक्स या दुचाकींचा समावेश आहे. याशिवाय दोन बेवारस वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त विनिता शाहू, पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ आणि सहायक पोलिस आयुक्त सत्यजित बंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश आडे यांच्या नेतृत्वात तपास पथकाने केली. पथकात पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राऊत आणि अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.