विसंगत जबाबामुळे साक्षिदारांनी विश्वासार्हता गमावली

न्यायालयाचे निरीक्षण : तपासातील त्रुट्यांमुळे तिघांची निर्दोष मुक्तता

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
The witnesses have lost their credibility कोरोना लॉकडाऊनदरम्यान दुकानांची जबरदस्तीने बंदी करण्याच्या प्रकाराला विरोध करणाऱ्या वाडी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जमावाने हल्ला केला होता. या प्रकरणात वाडी पोलिसांनी फक्त चार तरुणांवर गुन्हे दाखल केले होते. ‘पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास विलंब केला. तसेच ओळख परेड चक्क पोलिस ठाण्यात केली तसेच साक्षिदारांचे जबाब विसंगत असल्याने साक्षिदारांनी विश्वासार्हता गमावली. त्यामुळे आरोपींवरील आरोप सिद्ध होत नाहीत,’ असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी नोंदवत आरोपींची निर्दोष सुटका केली. पवन प्रेमदास गोंडाणे, रोहन कैलास राऊत आणि संजय ऊर्फ सुधीर कैलास राऊत अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील चौथा आरोपी दीपक रवी आटणकर याचा १५ मे २०२५ रोजी मृत्यू झाल्याने त्याच्याविरुद्धचा खटला निकाली काढण्यात आला होता.
 
 
 
s35443545657
 
 
 
वाडी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार सुरेश कावळते आणि पोलिस कर्मचारी रंजित धनेकर हे बीट मार्शल होते. दोघेही १५ मे २०२० रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता मोहदे ले-आउट, आठवा मैल परिसरात गस्त घालत होते. लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवण्याची परवानगी असलेली दुकाने काही युवक जबरदस्तीने बंद करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्याने ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी वाद होऊन नागरिकांच्या जमावाने काठ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये चार तरुणांवर गुन्हे दाखल करुन आरोपी करण्यात आले होते.
 
 
चक्क पोलिस ठाण्यात ओळख परेड
सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने १२ साक्षीदार तपासले. मात्र, प्रत्यक्षदर्शी म्हणून महत्त्वाच्या असलेल्या स्वतंत्र साक्षीदारांनी आरोपींना ओळखले नाही. काही साक्षीदारांनी अभियोजनाच्या कथनाला दुजोरा दिला नाही. जखमी पोलिसांनी आरोपींची ओळख घटनेनंतर उशिराने केली. त्यापूर्वी आरोपींचे वर्णन नोंदविण्यात आले नव्हते, तसेच ओळख परेडही पोलिस ठाण्यात पोलिसांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यास सुमारे पाच तासांचा विलंब झाला होता. त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण तपासात नोंदविण्यात आले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
 
 
फक्त संशयापलिकडे काहीच नाही
जखमी पोलिसांच्या वैद्यकीय नोंदींमध्ये हल्लेखोर अज्ञात असल्याचे नमूद होते. जप्त केलेल्या काठ्यांचा कथित हल्ल्याशी संबंध जोडणारा ठोस पुरावाही सादर करण्यात आला नाही. या सर्व बाबींचा विचार करून आरोपींविरुद्धचे आरोप संशयापलीकडे सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आणि तिघांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींची बाजू ॲड. चंद्रशेखर जलतारे, ॲड. गुरुप्रीसिंह चंडोक, ॲड. राजेंद्र साहू, ॲड. गौरव साहू, स्नेहल राऊत, महक सातपुते, ऋषभ मोजनकर, सिद्धी तायवाडे यांनी बाजू मांडली.