कापसाच्या पंढरीत खरेदी बंदच!

शेतकर्यांना १० हजारांपेक्षा जादा दर अपेक्षित

    दिनांक :23-Oct-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे),
mecca-of-cotton एकेकाळी कापसाची पंढरी समजल्या जाणार्या आणि जागतिक बाजारपेठेत सर्वोत्तम कापूस देणार्या स्थानिक बाजारपेठेत अद्याप कापूस खरेदीला सुरुवात झालीच नाही. तर दिवाळीपूर्वी खाजगी व्यापारी देखील उत्सुक दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात दोन-चार केंद्रांंवर कापसाची मर्यादित आवक नोंदवल्या गेली असून ९ हजार ५६७ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.
 
 
cotton
 
पोळ्यानंतर पाऊस अचानक गायव झाल्यामुळे सिंचित क्षेत्र वगळता शेतशिवारात मुबलक प्रमाणात कापसाची बोंड फुटल्याचे दिसत नाही. यंदा, सरकारने किमान मुल्यात किंचित वाढ केली आहे. परंतु, कापूस उत्पादक पट्ट्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोरडवाहू शेतातील कापूस बाजारात यायला अजून एक ते दीड महिना लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कापूस उत्पादक शेतकर्यांना किमान १० ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची अपेक्षा आहे.
  
सध्या दिवसभर तीव्र उष्णता जाणवत आहे. आर्थिक अडचण सारण्यासाठी शेतकरी हातात आलेल्या सोयाबीनची विक्री करण्याची धडपड करताना दिसत आहे. विहिरींची पातळी खोल गेली असून धरणाचे पाणी मिळणार नसल्याने शेतकर्यांनी चणा पेरण्याचा विचारही सोडून दिल्याचे दिसून येत आहे. त्यापेक्षा शेतातील पांढरे सोने जगवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुरांच्या वैरणाची व्यवस्था करणे शक्य झाले नाही तर नाईलाजाने जनावरं विकण्याची वेळही शेतकर्यांवर येऊ शकते.
 
 
सध्या कापूस काढणीची कामे सुरू आहे. जिल्ह्यातील चार केंद्रांमध्ये मोजक्याच कापसाची आवक झाली आहे. हिंगणघाट बाजार समितीअंतर्गत येणार्या वडनेर केंद्रात जे. आर. फायबर लिमीटेड कंपनीने ९ हजार ५६७ रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव दिला आहे. पावसाअभावी उत्पन्नात घट आल्याने कापसाची आवक मंदावणार असून दरही जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या कापसाची खरेदी बंदच असून शेतकर्यांनी १० हजाराच्या वर कापसाला दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.