पुणे
bhor minor assault case पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. दोन अल्पवयीन चुलत भावांनी १४ वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडित मुलीची प्रसूती झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन चुलत भावांनी जानेवारी २०२६ मध्ये तिला माळरानावर नेऊन दोन ते तीन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती. मात्र, ती गर्भवती राहिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
पीडित मुलीला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिची प्रसूती झाली. यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच भोर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवला आणि तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा पुढील तपास भोर पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलीशी संबंधित या गंभीर घटनेमुळे परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.