नवी मुंबई
nerul murder case नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सादिया शेख असे मृत तरुणीचे नाव असून, दानिश अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. २० ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आरोपीला घणसोली येथून अटक केली आहे. हल्ल्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिया आणि दानिश यांची गेल्या चार वर्षांपासून ओळख होती. सादियासाठी दानिशने धर्मांतर करून अनिल हे नाव बदलून दानिश असे नाव धारण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सादिया त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तो नाराज होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
२० ऑक्टोबर रोजी नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ दोघांची भेट झाली. यावेळी त्यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या वादादरम्यान दानिशने सादियावर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सादियाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. अखेर दानिश अन्सारी याला घणसोली येथील त्याच्या नातेवाइकाच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरलेला चाकूही हस्तगत केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमकी कारणे आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे नेरुळ परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.