seema pahwa दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या कौटुंबिक मनोरंजनपटातील ‘झुमका पटोला’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा पाहवा यांनी या गाण्यावर आपल्या खास शैलीत नृत्य करत त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर घातली आहे. त्यांच्या उत्स्फूर्त आणि सहजसुंदर नृत्याचा व्हिडिओ पाहून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे कौतुक केले आहे.
सीमा पाहवा यांच्या नृत्याला अभिनेत्री शर्वरी, ऋचा चड्ढा, अदिती राव हैदरी आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शर्वरीने ‘ओय्येऽऽऽ होय्येऽऽ!’ अशी प्रतिक्रिया दिली, तर ऋचा चड्ढाने ‘शबीना, तू खूप गोड आहेस!’ असे म्हणत त्यांचे कौतुक केले. भूमी पेडणेकरने ‘क्या बात है सीमा मॅम!’ अशी दाद दिली. अदिती राव हैदरीने प्रेम व्यक्त करत प्रतिक्रिया दिली, तर निमृत अहलुवालियाने त्यांना ‘दिवा’ म्हटले. गीतकार आणि संगीतकार स्वानंद किरकिरे यांनीही ‘वाह वाह!! मलाही नाचायचं आहे!’ अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री जेमी लीव्हरनेही ‘वॉव!’ म्हणत त्यांच्या नृत्याचे कौतुक केले.
राजश्री फिल्म्सच्या खास शैलीची झलक दाखवणाऱ्या या नृत्यामुळे ‘झुमका पटोला’ गाण्याच्या उत्सवी वातावरणात आणखी रंग भरले आहेत. आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे चित्रपटातील उत्साहपूर्ण संगीताचा भाग आहे. हिमेश रेशमिया यांनी या गाण्याला संगीत दिले असून, श्रेया घोषाल यांनी ते गायले आहे. गाण्याचे बोल सोनिया कपूर रेशमिया यांनी लिहिले आहेत. शबीना खान यांनी नृत्यदिग्दर्शन केले असून, छायाचित्रणाची जबाबदारी मनोज कुमार खट्टोई यांनी सांभाळली आहे.
राजश्री प्रॉडक्शन्स (प्रा.) लि. आणि महावीर जैन फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज आर. बडजात्या यांनी केले आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटातील गाणी आणि कलाकारांच्या विशेष सादरीकरणांमुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढताना दिसत आहे.