वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी युवा क्रिकेटपटूचे निधन

ल्युकेमियाशी झुंज अपयशी, बांगलादेश क्रिकेटमध्ये शोककळा

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
मुंबई
mehdi hasan hridoy क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू मेहदी हसन हृदोय याचे वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी निधन झाले. ल्युकेमिया अर्थात रक्ताच्या कर्करोगाशी तो झुंज देत होता. त्याच्या निधनामुळे बांगलादेशच्या क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, एका आश्वासक खेळाडूची कारकीर्द अकाली संपली आहे.
 

bangladesh cricketer mehdi hasan hridoy dies at 18 after battle with leukemia 
बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून ढाका येथे नेत असताना शनिवारी मेहदीने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आजाराची माहिती समोर आल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि देशाच्या क्रीडा मंत्रालयाने उपचारांसाठी आर्थिक मदत केली होती. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही.
मेहदी हसन हृदोय हा चट्टोग्राम विभागाच्या १८ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करत होता. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख होती. मेहनती आणि कौशल्यपूर्ण खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. भविष्यात देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, गंभीर आजारामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द अकाली थांबली.
या तरुण खेळाडूच्या निधनानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला आहे. ल्युकेमियाशी लढा देत असताना ढाका येथे त्याचे निधन झाल्याचे बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले. हृदोय हा चट्टोग्राम विभागाच्या १८ वर्षांखालील संघाचा आश्वासक डावखुरा वेगवान गोलंदाज होता आणि त्याच्याकडून उज्ज्वल भविष्याची अपेक्षा होती, असेही बोर्डाने नमूद केले.
या कठीण प्रसंगी बोर्डाने हृदोयच्या कुटुंबीयांप्रती आणि जवळच्या व्यक्तींप्रीत्यर्थ संवेदना व्यक्त केल्या. त्याच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही बोर्डाने केली.
अवघ्या १८व्या वर्षी आयुष्याची आणि क्रिकेटची स्वप्ने अपूर्ण ठेवून गेलेल्या हृदोयच्या निधनाने क्रीडाप्रेमींमध्ये शोक व्यक्त होत आहे. त्याच्या उपचारांसाठी मदतीचे प्रयत्न झाले, मात्र या लढ्यात त्याला वाचवता आले नाही, ही बाब क्रिकेटविश्वासाठी दुःखद ठरली आहे.