‘बिग बॉस 20’मध्ये रोहित शेट्टीचा संताप!

गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत स्पर्धकांना सुनावलं

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
मुंबई
rohit shetty ‘बिग बॉस 20’च्या घरात यंदाच्या ‘वीकेंड का वार’मध्ये चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी अभिनेता सलमान खानऐवजी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक रोहित शेट्टीने स्पर्धकांची शाळा घेतली. घरातील सदस्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत त्याने काही स्पर्धकांना खडे बोल सुनावले. विशेष म्हणजे, मुंबईतील आपल्या निवासस्थानाच्या इमारतीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ देत त्याने घरातील वादांवर संताप व्यक्त केला. दुसरीकडे, गुल्लूच्या खेळाचे कौतुक करत त्याला थेट ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्याची ऑफर दिल्याने हा भाग चर्चेत आला आहे.
 

bigg boss 20: rohit shetty slams contestants, offers gull u a spot on khatron ke khiladi 
‘बिग बॉस 20’च्या घरात काजी तौकीर, स्काऊट ओपी, आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. काही स्पर्धक एकत्र येऊन काजीला वारंवार लक्ष्य करत असल्याचे रोहितच्या निदर्शनास आले. यावर त्याने स्काऊट, आसिफ आणि यंग यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. घरात एखाद्या सदस्याला वारंवार लक्ष्य करण्यासाठी एकत्र येण्याची रणनीती बाहेर प्रेक्षकांमध्ये त्यांची प्रतिमा खराब करू शकते, असे त्याने सांगितले. अशा वागण्यामुळे खेळ सुधारण्याऐवजी चुकीचा संदेश जात असल्याचेही रोहितने त्यांच्या लक्षात आणून दिले.
या वादादरम्यान काजी बोलताना थुंकत असल्याचा आरोप आसिफने केला होता. या मुद्द्यावरूनही घरात चर्चा सुरू झाली. त्यावर रोहितने मुंबईतील गोळीबाराच्या घटनांचा संदर्भ देत स्पर्धकांना सुनावले. “इथे आमच्या घरांवर गोळ्या झाडल्या जात आहेत आणि तुम्ही लोक एकमेकांवर थुंकण्यात व्यस्त आहात,” अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली. त्याच्या या वक्तव्यामुळे घरातील वातावरण गंभीर झाले.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानाच्या इमारतीवर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर रोहितने बिग बॉसच्या घरातील किरकोळ वाद आणि स्पर्धकांच्या वर्तनावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. त्याने काजीला लक्ष्य करण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त केली आणि स्पर्धकांनी एकमेकांशी वागताना मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला.
याशिवाय, स्काऊट आणि लव गिल यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांचाही रोहितने उल्लेख केला. टेलिव्हिजनवर एखाद्या नात्याचे चित्रण ज्या पद्धतीने होते, त्याचा प्रेक्षकांकडून वेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो, असे त्याने सूचित केले. त्यामुळे घरातील सदस्यांनी आपल्या वागण्याचा आणि त्यातून बाहेर जाणाऱ्या संदेशाचा विचार करावा, असे त्याने बजावले.
या भागात केवळ rohit shetty स्पर्धकांची कानउघाडणीच झाली नाही, तर गुल्लूसाठी एक खास क्षणही पाहायला मिळाला. गुल्लूच्या खेळाचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या त्याच्या क्षमतेचे रोहितने कौतुक केले. त्यानंतर त्याने गुल्लूला आगामी ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्याची थेट ऑफर दिली. “तू खतरों के खिलाडीमध्ये ये ना,” असे म्हणत रोहितने त्याला विचारले. या अनपेक्षित ऑफरमुळे गुल्लूच्या पुढील प्रवासाबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
रोहित शेट्टीची परखड भूमिका, गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख आणि गुल्लूला मिळालेली ‘खतरों के खिलाडी’ची ऑफर यामुळे ‘बिग बॉस 20’चा हा ‘वीकेंड का वार’ विशेष चर्चेत आला आहे.