९ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं!

पती-पत्नीच्या वादाचा थरारक शेवट

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
मुंबई,
ghatkopar-baby-throwing-caseमुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर एका पित्याने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत बाळ गंभीर जखमी झालं असून, त्याच्यावर शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
 

baby 
या प्रकरणातील तक्रारदार महिलेचं नाव आरती जाफर शेख (वय 22) असं आहे. ती घाटकोपरमधील सर्वोदय नगर परिसरात राहते. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचा जाफर शेख (वय 23) याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला आरव नावाचा नऊ महिन्यांचा मुलगा आहे. आरोपी जाफरचा परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला नशा करण्याचं व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वाद होत होते. रविवारीदेखील दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
 
रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास आरती आपल्या नऊ महिन्यांच्या बाळासह घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर उभी होती. त्याचवेळी तिचा पती जाफर तिथे आला. त्याने पुन्हा एकदा पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद सुरू असतानाच जाफर बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, आरतीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या जाफरने कथितपणे आपल्या नऊ महिन्यांच्या मुलाला स्कायवॉकवरून खाली फेकून दिलं. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
 
बाळाला खाली फेकल्याचं लक्षात येताच आरतीने तातडीने खाली धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिने जखमी बाळाला प्रथम राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या बाळावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली. आरतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जाफर शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.