
राजकारणातील नेत्यांनी वादग्रस्त विधान करण्याची आपल्या देशातील ही पहिली वेळ नाही. आतापर्यंत किमान डझन दोन डझन नेत्यांनी अशी वादग्रस्त विधाने करत खळबळ उडवली आहे. काही वेळा अशी विधाने बोलण्याच्या ओघात निघून जातात, तर अनेकवेळा ती ठरवून आणि जाणीवपूर्वक केली जातात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी वा चर्चेत राहण्यासाठी पुष्कळवेळा राजकीय नेते अशी विधाने करत असतात. एखादे विधान अंगलट येत आहे, असे दिसले तर माझ्या विधानाचा विरोधकांनी विपर्यास केला, मला तसे बोलायचे नव्हते, असे म्हणायला हे नेते मोकळे असतात. खूपच झाले तर खेद व्यक्त करून हे नेते काही झालेच नाही, अशा आविर्भावात वागू लागतात. विशेष म्हणजे अशी वादग्रस्त विधाने करण्यात कोणत्याच पक्षाचे नेते मागे नसतात. विरोधी वा सत्ताधारी असा फरक यात राहत नाही. मात्र तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर काँग्रेस नेते यात आघाडीवर दिसतात. राजकीय नेत्यांना काय बोलायचे यापेक्षा काय बोलू नये, हे समजले पाहिजे.
राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांची तर मोठी मालिकाच आहे. २०१९ मध्ये कर्नाटकातील कोलार येथील एका सभेत राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते’, असे विधान करत खळबळ उडवली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधींना आपले लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले होते.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी आपल्या वादग्रस्त विधानाने आपल्या पक्षाला आणि सरकारला अनेकवेळा अडचणीत आणले आहे. संपुआ सरकारच्या काळात दोन सत्ताकेंद्रे (सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग) योग्य प्रकारे काम करत नसल्याचा आरोप दिग्गीराजा यांनी करत आपल्याच पक्षाला आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. पुलवामा घटनेनंतर दिग्विजयसिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याचे पुरावे मागितले होते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या निर्णयाला विरोध करत दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर ३७० कलम पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन दिले होते. हिंदू लोक गोमांस खात असल्याचा तसेच सावरकरही गोमांसभक्त असल्याचा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला होता. रा. स्व. संघाची तुलना दिग्विजयसिंह यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)शी केली होती, तसेच ओसामा बिन लादेन यांचा उल्लेख ‘ओसामाजी’ असा आदरार्थी करत आपली लायकी दाखवली होती.
काँग्रेसचे सर्वांत जास्त नुकसान भाजपा आणि भाजपा नेत्यांनी नाही तर काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच केले, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. गेल्या १५ ते २० वर्षात देशातील राजकारणाचा पोत बदलला आहे. त्याच्या आधीचे राजकारणी, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, अतिशय सभ्य आणि संयमित भाषेत बोलत होते. समोरच्या नेत्यावर टीका करतानाही आपल्या भाषेचा दर्जा आणि पातळी घसरणार नाही, याची काळजी घेत असत. बोलण्याच्या ओघात एखादा वावगा शब्द तोंडातून निघून गेला तर मनाचा मोठेपणा दाखवत माफी मागायलाही मागेपुढे पाहत नव्हते. कारण त्या काळातील सर्वच नेते सभ्य आणि सुसंस्कृत होते.आजच्या काळातील नेत्यांबद्दल काही सन्माननीय अपवाद वगळता असे म्हणता येत नाही. सध्याच्या नेत्यांमध्ये वादग्रस्त विधाने करण्याची अहमहमिका लागल्याचे दिसते आहे. फक्त वादग्रस्त विधाने करूनच हे नेते थांबत नाही तर पातळी सोडत अश्लील आणि दुहेरी अर्थ निघणारी विधाने करायलाही कचरत नाहीत. समोर बसणाऱ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि खीखी केले की या नेत्यांना आणखी जोश येतो. त्यामुळे नेत्यांकडून, मग ते कोणत्याही पक्षाचे असले तरी, सभ्यतेची तसेची सुसंस्कृतपणाची अपेक्षा आपल्याला करता येईल का?
९८८१७१७८१७