‘दुष्काळाच्या झळां’पासून पशुधनाला वाचविण्यासाठी प्रशासन सज्ज!

जिल्ह्यातील ४.७८ लाख पशुधनासाठी चारा-पाणी आराखडा तयार

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
gondia-livestock-water-fodder-planसंभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ७८ हजार १४८ पशुधनासाठी सन २०२६-२७ चा चारा-पाणी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पशुधनाची तहान भागविण्यासाठी दररोज १.११ कोटी लिटर पाणी, तर उदरनिर्वाहासाठी सुमारे १ हजार ९७९ मे.टन चार्‍याची आवश्यकता भासणार आहे.
 

pashui
 
२१ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ७८ हजार १४८ पशुधन आहे. यामध्ये २ लाख ४७ हजार ३१० गाय व म्हैसवर्गीय जनावरे, ३३ हजार ७२४ लहान पशुधन, तर १ लाख ९७ हजार ११४ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. टंचाईच्या काळात मोठ्या जनावराला दररोज ४० लिटर, लहान जनावराला १५ लिटर आणि शेळी-मेंढीला ४ लिटर पाणी आवश्यक असल्याच्या निकषानुसार जिल्ह्याला दररोज १ कोटी ११ लाख ८६ हजार ७१६ लिटर पाण्याची गरज भासणार आहे. यामध्ये गोंदिया तालुक्याची गरज सर्वाधिक २७ लाख ३६ हजार ८५४ लिटर असून, तिरोडा तालुक्याला २२ लाख ४७ हजार १०७ लिटर आणि गोरेगाव तालुक्याला १२ लाख ३७ हजार १४२ लिटर पाणी लागणार आहे.
 
अर्जुनी मोरगाव तालुक्यात दररोज ५ लाख ८१ हजार ३८७ लिटर पाण्याची आवश्यकता राहणार आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी दररोज सुमारे १ हजार ९७९.२६ मे.टन, तर महिन्याला ५९ हजार ३७७.८६ मे.टन चारा आवश्यक आहे. बांधावरील वैरण, वनक्षेत्रातील चारा, पडीत जमिनीवरील गवत, कृषी पिकांचे अवशेष आणि वैरण विकास योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात ३ लाख ९९ हजार ४७६.८३३ मे.टन चारा उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उपलब्ध चार्‍याचे प्रमाण समाधानकारक दिसत असले तरी उन्हाळ्यात हिरव्या चार्‍याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारा उत्पादन वाढविण्यासोबतच उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
वैरण बियाण्यांसाठी निधीची तरतूद...
रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविण्यासाठी ३० लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ५० लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटप प्रस्तावित आहे. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पातून आतापर्यंत ६.५२ लाख रुपयांचे बियाणे वितरित करण्यात आले असून, आणखी २.६३ लाख रुपयांचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. ज्वारी, बाजरी, मका आणि बरसीम यांसारख्या कमी पाण्यात वाढणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या वैरण पिकांच्या बियाण्यांचे शेतकर्‍यांना मोफत वाटप करण्याचे नियोजन आहे. वन विभागाच्या सहकार्याने वनक्षेत्रातील गवत व चारा उपलब्ध करून घेण्याचीही तयारी करण्यात आली आहे.
गावोगावी पाणीपुरवठ्याचे नियोजन...
संभाव्य टंचाईच्या काळात पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गावोगावी तात्पुरते हौद उभारणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.