ब्रिस्बेन हीटचा भारतीय खेळाडूवर विश्वास

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
brisbane-heat महिला बिग बॅश लीगच्या (डब्ल्यूबीबीएल) आगामी हंगामापूर्वी ब्रिस्बेन हीट संघाने महत्त्वाचा बदल केला आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू जेस जोनासेन हिला संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार असल्याने तिच्या जागी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया हिची निवड करण्यात आली आहे. यास्तिकाने यापूर्वी डब्ल्यूबीबीएलमध्ये मेलबर्न स्टार्सचे प्रतिनिधित्व केले असून, अलीकडेच ती कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळली होती.
 
brisbane-heat
 
यास्तिका भाटियासाठी हे पुनरागमन विशेष ठरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एसीएलला दुखापत झाल्यामुळे ती जवळपास १८ महिने क्रिकेटपासून दूर होती. या दुखापतीमुळे तिला भारताच्या २०२५ मधील एकदिवसीय विश्वचषक विजयाच्या मोहिमेतही सहभागी होता आले नव्हते. मात्र, प्रदीर्घ विश्रांतीनंतर तिने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. जूनमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान तिने भारतीय संघात पुनरागमन केले, तर जुलैमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी शतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने इंग्लंडविरुद्धचा हा कसोटी सामना २७० धावांनी जिंकला होता.
 
यास्तिकाला ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा अनुभवही आहे. तिने ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ब्रिस्बेन हीट संघात तिच्यासोबत इंग्लंडची फिरकी गोलंदाज सारा ग्लेन आणि आयर्लंडची अष्टपैलू खेळाडू ऑर्ला प्रेंडरगास्ट या दोन परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.
 
डब्ल्यूबीबीएलचा आगामी हंगाम २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, ब्रिस्बेन हीटचा पहिला सामना ३० ऑक्टोबर रोजी सिडनी सिक्सर्सविरुद्ध होईल. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी सिडनी थंडरविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी यास्तिका भाटिया संघात दाखल होणार आहे. या हंगामात सहभागी होणारी ती एकमेव भारतीय खेळाडू असल्याचे सांगितले जात आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ५ डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.