इंग्लंडचा दिग्गज आता इटलीचा कर्णधार

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
रोम(इटली),
england-legend-now-captain-of-italy इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या क्रिकेट कारकिर्दीला आता नवे वळण मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही खेळ सुरू ठेवणाऱ्या अँडरसनने आता इटली टी१० लीगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत त्याची नेपोली नाइट्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, तो या संघाचा सह-मालकही असणार आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी नव्या स्वरूपातील क्रिकेटमध्ये खेळताना दिसणाऱ्या अँडरसनच्या या निर्णयाकडे त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
 
captain-of-italy
 
लँकेशायरसोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर अँडरसनने इटलीतील नव्या क्रिकेट स्पर्धेकडे आपला मोर्चा वळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही तो इंग्लंडमधील लँकेशायर क्लबकडून खेळत होता. यंदाच्या हंगामात त्याने संघाचे नेतृत्वही केले होते. मात्र, जवळपास २५ वर्षे या क्लबशी जोडलेला असूनही लँकेशायरने त्याचा करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अँडरसनने इटली टी१० लीगच्या माध्यमातून क्रिकेटमधील आपली नवी इनिंग सुरू करण्याचे ठरवले.
 
अँडरसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. इंग्लंडकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून त्याने ४०१ सामने खेळले असून, त्याच्या नावावर ९९१ बळींची नोंद आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्यामुळे त्याने जागतिक क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. आता टी१० या वेगवान आणि आक्रमक स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी कशी ठरते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
 
इटली टी१० लीगला १८ नोव्हेंबरपासून रोम क्रिकेट ग्राउंडवर सुरुवात होणार आहे. १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून, प्रत्येक डावात दहा षटके खेळवली जातील. माजी व्यावसायिक क्रिकेटपटू नदीम शाहिद आणि आमिर अख्तर यांनी या लीगची सुरुवात केली आहे. नेपाळमध्ये एव्हरेस्ट प्रीमियर लीग स्थापन करण्यातही त्यांची भूमिका होती.
 
अँडरसनसोबतच ख्रिस गेल, शॉन मार्श आणि डेव्हिड मलान यांसारखे नामांकित क्रिकेटपटूही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. इटलीच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंनाही या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या टी२० विश्वचषकात इटलीच्या संघाने इंग्लंडला कडवी लढत दिली होती; मात्र अटीतटीच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने इटलीतील स्थानिक क्रिकेटपटूंना आपला खेळ सुधारण्यासाठी आणि अनुभव वाढवण्यासाठी या स्पर्धेचा फायदा होऊ शकतो.