मुंबई
Onion दिवाळीचा सण जवळ येत असतानाच महागाईने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडवले आहे. रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात चांगल्या दर्जाचा कांदा प्रतिकिलो ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीसोबतच रोजच्या जेवणाचा खर्चही वाढला आहे. कांदा, लसूण आणि आल्याच्या वाढलेल्या किमतींमुळे गृहिणींच्या बजेटवर ताण आला असून, व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार आगामी दीड महिन्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाही.
कांद्याच्या घाऊक दरातील वाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर होत आहे. गेल्या काही दिवसांत बाजार समित्यांमधील कांद्याचे दर प्रतिकिलो ५५ ते ६५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यात वाहतूक खर्च आणि कमिशनपोटी आणखी सुमारे पाच टक्के शुल्क द्यावे लागत असल्याने विक्रेत्यांचा खरेदी खर्च वाढला आहे. परिणामी, किरकोळ विक्रेत्यांना घाऊक बाजारातून कांदा ६५ ते ७० रुपये किलो दराने खरेदी करावा लागत असून, ग्राहकांना तो ८० रुपये किलोपर्यंत मोजून घ्यावा लागत आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.
कांद्याच्या दरवाढीमागे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत हे प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जुन्या कांद्याचा साठा जवळपास संपला असून, नवीन पीक मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढत असताना बाजारातील पुरवठा मर्यादित असल्याने दर चढे राहिले आहेत. त्यामुळे आगामी किमान दीड महिनाभर कांद्याच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.कांद्याबरोबरच लसणाच्या दरांनीही ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे. घाऊक बाजारात लसणाचा दर प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये असून, किरकोळ बाजारात तो ३२० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. थंडी वाढल्यानंतर लसणाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने त्याचे दरही चढे राहू शकतात, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
दुसरीकडे, जुन्या Onion आल्याचा साठा जवळपास संपल्याने बाजारात नवीन आले विक्रीसाठी दाखल झाले आहे. नवीन आल्याचा दर प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी नियमित लागणाऱ्या कांदा, लसूण आणि आल्याच्या दरवाढीचा एकत्रित परिणाम घरगुती खर्चावर होत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नियोजन करणाऱ्या ग्राहकांना आता स्वयंपाकघराचे बजेटही नव्याने आखावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.