डीआरआयची कारवाई; २.४० कोटींचे अंमली पदार्थ जप्त

दिल्ली ते बंगळुरू तस्करीचा डाव; दोन तरुणांना अटक

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
dri operation narcotics महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर पथकाने खासगी प्रवासी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना तीन किलो ॲम्फेटामाइन या अंमली पदार्थासह अटक केली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत २ कोटी ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही आरोपी दक्षिण भारतातील असून, दिल्लीहून बंगळुरूकडे या अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
 
dri operation
 
 
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने बुधवारी दुपारी सावनेरच्या पुढे भागीमाहेरी टोल नाक्याजवळ एका खासगी प्रवासी बसला थांबवले. बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांच्या बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये तीन किलो ॲम्फेटामाइन आढळून आले. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावल्याची माहिती आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्लीहून अंमली पदार्थ घेऊन बंगळुरूकडे निघाले होते. सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यासाठी त्यांनी प्रवासाचे मार्ग आखले होते. दिल्लीहून भोपाळ, तेथून दुसऱ्या बसने नागपूर, त्यानंतर बस बदलून हैदराबाद आणि अखेरीस बंगळुरूला पोहोचण्याची त्यांची योजना होती. प्रवासादरम्यान वारंवार बस बदलून अंमली पदार्थांची वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा संशय आहे.dri operation narcotics रेल्वेमार्गावरील तपासणी आणि सुरक्षा यंत्रणांची वाढती नजर टाळण्यासाठी तस्करांकडून खासगी प्रवासी बसचा वापर केला जात असल्याची शक्यता या कारवाईमुळे पुढे आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे दहा दिवसांपूर्वीही डीआरआयच्या नागपूर पथकाने प्रवासी बसमधून अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तरुणांना पकडले होते. त्यामुळे नागपूरचा वापर अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी होत आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, अंमली पदार्थांचा पुरवठा कोठून करण्यात आला आणि बंगळुरूमध्ये तो कोणाला दिला जाणार होता, याचा शोध डीआरआयचे पथक घेत आहे. आरोपी यापूर्वीही अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी होते का, याचीही चौकशी सुरू आहे