अनिल कांबळे
नागपूर,
grain trader नामांकित आयटीसी कंपनीची एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर ठकबाजाने एका धान्य व्यापाऱ्याला ४ लाख ७८ हजार रुपयांचा गंडा घातला. फेसबुकवरील जाहिरातीच्या माध्यमातून व्यापाऱ्याशी संपर्क साधून त्याचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरायला लावून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी रूपेश व्यास यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी कथित विक्रम गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश व्यास हे धान्याचे व्यापारी आहेत. मोबाइलवर माहिती शोधत असताना त्यांना फेसबुकवर कोलकाता येथील आयटीसी कंपनीच्या नावाने एक जाहिरात दिसली. जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. समोरील व्यक्तीने आपले नाव विक्रम गुप्ता असल्याचे सांगत आयटीसी कंपनीची एजन्सी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. व्यास यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने त्यांच्या ई-मेलवर वितरकत्वाशी संबंधित पत्र पाठविले. त्यामुळे व्यास यांना संबंधित व्यक्तीवर विश्वास बसला. त्यानंतर कथित १० वर्षांच्या विम्यासाठी रक्कम भरावी लागेल, असे सांगून आरोपीने पैशांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून व्यास यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांतून एकूण ४ लाख ७८ हजार रुपये ऑनलाइन पाठविले.
कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर फसवणूक उघड
रक्कम भरल्यानंतर व्यास यांना संशय आला. त्यांनी आरोपीशी पुन्हा संपर्क साधला असता, दुसऱ्या दिवशी माल पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, माल पोहोचला नाही. त्यामुळे व्यास यांनी नागपुरातील बुरानी हाउस कॉम्प्लेक्स येथील आयटीसी कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा अशा प्रकारे एजन्सी किंवा काम दिले जात नसल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.grain trader पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. संबंधित मोबाइल क्रमांक, बँक खात्यांतील व्यवहार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.