अनिल कांबळे
नागपूर,
smuggling case एम.डी. (मेफेड्रोन) पावडर बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी अब्दुल करीम मलिक याला गुन्हे शाखेने अटक केली. कन्हान-कामठी मार्गावर ड्रॅगन पॅलेस टर्निंगजवळ पोलिसांनी त्याची कार अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर कार महामेट्रोच्या बॅरिकेडला धडकून उलटली. या कारमध्ये करीमसह अन्य दोघे होते. पोलिसांनी तिघांनाही बाहेर काढून ताब्यात घेतले.
२४ सप्टेंबर रोजी रात्री ८.२० वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यशोधरानगर परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसलेल्या इजाजउद्दीन सिद्दीकी (४०, रा. हमीदनगर, यशोधरानगर) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून ५८ ग्रॅम ६०० मिलिग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान इजाजउद्दीनने जप्त करण्यात आलेली एम.डी. पावडर अब्दुल करीम मलिक आणि त्याचा भाऊ अमीर मलिक यांची असल्याचे सांगितले होते. तसेच शिबू मलिक, कैफ मलिक, सागर अन्सारी आणि ओसामा हेही त्यांच्यासाठी एम.डी. पावडर विक्री करीत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम मलिक याच्यासह अन्य आरोपींचा शोध सुरू होता.
माहितीनुसार कार तेथे येताच पोलिसांनी बॅरिकेडच्या साहाय्याने ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता बेदरकारपणे पुढे दामटले. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर कार महामेट्रोच्या बॅरिकेडला धडकून उलटली. त्यानंतर पोलिसांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांना ताब्यात घेतले.smuggling case कारमध्ये अब्दुल करीम मलिक (३३, रा. हमीदनगर, यशोधरानगर), मोहम्मद शारीक (३३, रा. वांजरा ले-आऊट, पिवळी नदी) आणि गुलाम ऐशदान अन्सारी (२६, रा. फारुखनगर, टेका, पाचपावली) हे आढळून आले. एम.डी. प्रकरणातील फरार आरोपी अब्दुल करीम मलिक याला पुढील कारवाईसाठी यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार इम्रान शेख, ज्ञानेश्वर भोगे यांनी केली.