विवाहितेचा अश्लील व्हिडीओ पतीला पाठविला

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप; सीताबर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
crime ओळखीचा गैरफायदा घेत एका ३० वर्षीय विवाहितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचा अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकेच नाहीतर आरोपीने हा व्हिडीओ महिलेच्या पतीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून तिची बदनामी केली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी ३२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
 
 
crime
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या हॉटेलच्या शेजारी आरोपीची बेकरी आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून दोघांची ओळख होती. आरोपीने महिलेचा मोबाइल क्रमांक मिळविल्यानंतर तिच्याशी फोनवर बोलणे सुरू केले. मे २०२५ मध्ये महिला हिंगणा परिसरातील माहेरी आली असताना आरोपी तिला लोखंडीपुलाजवळ भेटला. तेथून तो तिला भाजी मंडी रोडवरील आनंद टॉकीज चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपीने महिलेला पुन्हा त्याच ठिकाणी नेले. तेथे धमकावून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत तो तिला ब्लॅकमेल करीत होता. शेवटी कंटाळून महिलेने आरोपीशी संपर्क तोडला. यामुळे संतापलेल्या आरोपीने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित व्हिडीओ महिलेच्या पतीच्या व्हॉट्सॲपवर पाठविला. त्यानंतर महिलेने भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेथे शून्य प्रथम माहिती अहवाल (झिरो एफआयआर) नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण सीताबर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. सीताबर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.