मुंबई
Adulteration-Free Sweets दरवर्षी दिवाळी जवळ आली कि राज्याच्या अन्न आणि औषध विभागाकडून ठिकठिकाणी धाडी टाकल्याच्या आणि भेसळयुक्त मिठाई जप्त केल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात, त्यामुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन केवळ दिवाळीच्या निमित्तानेच कार्यन्वित होते असा भ्रम राज्यातील सामान्य नागरिकांचा झाला होता; मात्र जेव्हापासून या खात्याचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी हाती घेतला आहे तेव्हापासून हे खाते २४ तास 'ऍक्टिव्ह' मोडमध्येच आहे. या खात्याशी संबंध येणाऱ्या राज्यातील समस्त कंपन्यांनी मुंढे यांचा धसका घेतल्याने यंदा दिवाळीत आपल्याला कमीतकमी भेसळ असलेली किंवा शुद्ध मिठाई खायला मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. 'अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा राज्यातील १२ कोटींहून अधिक जनतेशी थेट जोडला गेला आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे, हे कर्तव्य असून फाईव्ह स्टार असो वा स्ट्रीट फूड, प्रत्येकाला अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे; मात्र अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष तर कारवाई अटळ, असा थेट इशारा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सवाच्या आधीच दिला होता. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन गोदामे, कारखाने यांसह दुकानदारांनाही त्यांनी सूचित केले आहे.
दिवाळी जवळ आल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतीच १०५७ मसाला उत्पादक आस्थापनांची चौकशी केली. या कारवाईत तब्बल १९.६९ कोटी रुपये किमतीचे ११,९६३ क्विंटल मसाले आणि मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. ५५७ जणांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. गोंदिया शहरातील कुडवा येथील लोहिया वॉर्डातील ‘रिफा दूध डेअरी’वर १३ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाने तपासणी केली. यावेळी अस्वच्छ वातावरणात तयार आणि साठवून ठेवलेले सहस्रो किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. संभाजी नगरातील बजाज नगरमधील बिकानेर मिठाईच्या दुकानात अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतीच धाड टाकून भेसळयुक्त आणि नित्कृष्ट दर्जाची मिठाई तसेच अन्य अन्न पदार्थ यांचा सुमारे ६३ किलो साठा जागेवरच नष्ट केला. दुकानाचा परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला. नवरात्रीदरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाने सप्तशृंगी गडावर विशेष तपासणी मोहीम राबवून १३ आस्थापनांवर कारवाई केली ज्यामध्ये ५ लक्ष ६२ सहस्त्र मूल्याची १४०८ किलो मिठाई नष्ट केली. अशाच प्रकारची कारवाई नवरात्रीमध्ये तुळजापूरातही करण्यात आली होती ज्यामध्ये सव्वाचार कोटी रुपये किमतीचा १ लक्ष ९७ सहस्त्र ४८० किलो संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.
कमी खर्चात अधिक उत्पन्न Adulteration-Free Sweets मिळवण्याच्या लोभाने ही भेसळयुक्त मिठाई बनवली जाते. भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्यास घशात खवखव होते, खोकला येतो आणि पोटात दुखते. चक्कर येणे, पोटात मळमळणे , उलटी, जुलाब सुरु होणे यांसारखे परिणाम जाणवू लागतात. काविळसारख्या आजाराची लागण होऊ शकते. किडनी आणि यकृतावरही भेसळयुक्त मिठाईचा गंभीर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर विषबाधा अधिक झाल्यास खाणाऱ्याचा मृत्यूही ओढावू शकतो. भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. कृत्रिम दुधात युरियाची भेसळ असल्यास युरियातील नायट्रोजनमुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय निकामी होऊ शकते. खावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध केमिकलयुक्त असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यास भारतीय दंड विधान ३२८ कलमान्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. मिठाईसाठी वापरण्यात आलेल्या दुधात पाणी आणि दुधाची पावडर मिश्र केल्याचे आढळल्यास २६२ कलमान्वये गुन्हेगारास आर्थिक दंड ठोठावण्यात येतो. असे असूनही प्रतिवर्षी मिठाईत केल्या जाणाऱ्या भेसळीचे प्रमाण कमी न होता त्यांमध्ये वाढच होत आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाई सर्रासपणे विकली जाते. आर्थिक लाभासाठी पामतेलाचा वापर करून खवा बनवणे. कृत्रिम आणि केमिकलयुक्त दूध तयार करून त्यापासून मिठाई बनवणे यासारखे प्रकार सणासुदीच्या काळात प्रकर्षाने घडतात. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा महाभागांना खरेतर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे; मात्र अनेकदा ही मंडळी कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन निर्दोष सुटतात किंवा जामिनावर बाहेर पडतात. यांना कायद्याचे भय न राहिल्याने दरवर्षी भेसळयुक्त मिठाई बनवून विकणाऱ्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे.
मिठाई बनवण्यासाठी Adulteration-Free Sweets लागणारा प्रमुख कच्चा माल म्हणजे दूध. या दुधातच प्रतिदिन मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते यासंदर्भात प.पू. काडसिद्धेश्वर महाराज यांनी २०२२ साली सांगितलेली माहिती अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी त्यावेळी सांगितले होते कि प्रतिदिन देशभरात ६५ कोटी लिटर दुधाची गरज भासते. देशभरातील गाई, म्हैशी, शेळ्या आणि उंट यांच्यापासून प्रतिदिन मिळणारे एकूण दूध केवळ १५ कोटी लिटर आहे याचाच अर्थ प्रतिदिन ५० कोटी लिटर दूध हे भेसळ करून बनवले आणि पुरवले जाते. अनेक दूध उत्पादक कंपन्या जेवढे दूध प्राण्यांकडून मिळवतात त्याच्या दुप्पटीने विकतात याचाच अर्थ अधिकचे दूध ते कृत्रिम पद्धतीने बनवतात. देशातील ८० टक्के मिठाई ही नकली दुधापासून तयार केलेल्या खव्यापासून बनवली जाते. भारताला रोज कमी पडणारे ५० कोटी लिटर दूध कसे मिळवता येईल यावर काम केले तर कित्येकांना रोजगार मिळेल. महाराजांनी ४ वर्षांपूर्वी केलेल्या या भाष्यातील आकडेवारी जरी बदलली असली तर प्रमाण हे सारखेच आहे. दूध देणारे स्रोत हे मर्यादित असताना सणांच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात मिठाई बनते तरी कशी असा आपल्याला प्रश्न पडायला हवा. मिठाईतील अर्थात दुधातील भेसळ हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याशी खेळ आहे आणि तो खेळणारे दरवर्षी लक्षावधी रुपयांचा नफा कमावत असतात. ही भेसळ रोखणे एकट्या तुकाराम मुंढेंचे किंवा अन्न आणि औषध प्रशासनाचेच काम नाही त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. चला तर मग यंदाची दिवाळी भेसळखोरांना धडा शिकवून साजरी करूया !