संजय राऊतांवरील विधान भोवलं?

मंत्री नितेश राणेंविरोधात न्यायालयाचे पुन्हा वॉरंट

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
मुंबई
Nitesh Rane राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने नितेश राणे यांच्याविरोधात पुन्हा वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट काढण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
 

Nitesh Rane Faces Court Warrant in Sanjay Raut Defamation Case 
सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या विधानावरून हा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राणे यांनी केला होता. या विधानाविरोधात राऊत यांनी माझगाव न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. मे २०२३ मध्ये पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी यासंदर्भात भूमिका मांडली होती.
राणे यांनी त्यावेळी संजय राऊत येत्या दोन ते तीन आठवड्यांत, म्हणजेच १० जूनपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला होता. राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तसेच अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर काढण्याच्या अटीवर राऊत पक्षात प्रवेश करण्यास तयार असल्याचा आरोपही राणे यांनी केला होता. या विधानामुळेच संजय राऊत यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, या मानहानी प्रकरणाच्या सुनावणीस नितेश राणे वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने यापूर्वी त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट जारी केले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कणकवली पोलिसांकडून या वॉरंटची अंमलबजावणी झालेली नसल्याचा मुद्दा संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर उपस्थित केला. त्यानंतर न्यायालयाने आता राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाचा पत्ता देत नव्याने वॉरंट जारी केले आहे.
या घडामोडीनंतर नितेश राणे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. न्यायालयाच्या नव्या आदेशानंतर ते काय भूमिका मांडतात, तसेच आगामी सुनावणीला उपस्थित राहतात का, याकडे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामुळे आता मंत्री नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.