मध्यरात्री पालघरमध्ये भूकंपाचे धक्के! घरांच्या भिंतींना तडे

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |

पालघर,
palghar-earthquake-tremorsपालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतरही जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली. पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी पालघरमध्ये १.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपाची नोंद जमिनीखाली पाच किलोमीटर खोलीवर झाली.
 
palghar
 
 
मध्यरात्री अचानक जमीन हादरल्याचा अनुभव आल्याने काही भागांतील नागरिकांमध्ये घबराट पसरली. घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र, या भेगा नेमक्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पडल्या आहेत का, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर पालघर जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले. पहिला धक्का रात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्यानंतर पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी पुन्हा धक्का जाणवला. दुसऱ्या धक्क्याची तीव्रता १.८ रिश्टर स्केल असल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
 
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या भागांमध्ये यापूर्वीही वारंवार सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ३.२ ते ३.७ तीव्रतेचे अनेक धक्के जाणवले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भूकंपाबाबत आधीपासूनच चिंता आहे.
 
 
विशेष म्हणजे, काही वेळा नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवतात; मात्र त्यांची नोंद सरकारी ॲपवर लगेच दिसत नाही. दोनपेक्षा कमी तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद ॲपवर दिसत नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वी स्पष्ट केले होते. धुंदलवाडी परिसरात भूकंपाची नोंद घेण्यासाठी भूकंपमापक यंत्रही बसवण्यात आले आहे.
 
दरम्यान, वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे पालघरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या या मध्यरात्रीच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.