पुणे,
pimpri-chinchwad-arya-kamble-fire-heroism-पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीला भिडून, तब्बल 70 ते 80 रहिवाशांना जीवदान देणाऱ्या 20 वर्षीय आर्या कांबळे हिच्या अद्वितीय शौर्याची आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आर्याच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून तिचे अभिनंदन केलं आहे. मध्यरात्री पावणे 2 च्या सुमारास पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीने रौद्ररूप धारण केले होते. घराच्या दारात धूर आणि ज्वाला पोहोचलेल्या होत्या, जिथं या परिस्थितीला वडील घाबरले तिथे आर्याने धैर्याने सामोरं जायचं ठरवलं. वडिलांचा विरोध झुगारून तिने गॅलरीतून उडी मारली. पायाला गंभीर दुखापत झाली, तरीही स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने सोसायटीतील रहिवाशांना जागे केले आणि सर्वांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी तिच्या या अद्वितीय शौर्याची दखल घेतलीये. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून आर्याचं तोंड भरुन कौतुक केलंय. संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणे हे धैर्य आणि प्रसंगावधानाचे जिवंत उदाहरण आहे. आर्याच्या शौर्यामुळे मोठी जीवितहानी टळली, असेही त्यांनी नमूद केले. 17 दुचाकी आणि 4 चारचाकी जळून खाक झाल्या, मात्र आर्याच्या धाडसामुळे एकही जीव गेला नाही. तिच्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रातून म्हटले आहे.
सर्वप्रथम तुझे मनापासून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन. आर्या, ज्या धीरोदात्तपणे आणि प्रसंगावधान राखून तू अनेकांचे जीव वाचवलेस, या साहसाला तोड नाही. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत तू स्वतःचा विचार न करता, इतरांचा प्राण वाचविण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारलीस. यात तुझ्या पायाला दुखापत होऊनही इतरांचा जीव वाचविण्यासाठी केलेली तुझी धडपड, हे मोठे साहसच आहे.
महाराष्ट्राला शूर-वीरांची, त्यातही अनेक वीरांगनांची परंपरा लाभली आहे. संकटाच्या काळात, या सर्व रणरागिणींनी प्रसंगी जीवावर उदार होऊन शत्रूंचा पराभव केला आहे. आधुनिक काळात आपत्कालीन परिस्थितीत धीराने टाकलेले पाऊल आणि संकटावर मात करण्यासाठी केलेली विचारपूर्वक कृती ही देखील एखाद्या पराक्रमाहून कमी नाही.