पुणे
PMPML Senior Citizen Discount ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून प्रवास करणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांना आता तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. येत्या १ नोव्हेंबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नियमितपणे बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासखर्चात मोठी बचत होणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला पीएमपीच्या संचालक मंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ही सवलत प्रत्यक्षात लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणाला मिळणार सवलतीचा लाभ?
या निर्णयाचा लाभ पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. पीएमपीच्या बसमधून प्रवास करताना त्यांना नियमित तिकीट दराच्या निम्मे भाडे द्यावे लागणार आहे.
दैनिक पासच्या दरातही कपात PMPML करण्यात आली आहे. यापूर्वी ७० रुपयांना मिळणारा पीएमपीचा दैनिक पास आता ज्येष्ठ नागरिकांना ३५ रुपयांत मिळणार आहे. त्यामुळे दिवसभरात अनेकदा बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीचा विशेष फायदा होणार आहे.या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांचे वय ६० वर्षे पूर्ण असल्याचा पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी पॅनकार्ड किंवा पीएमपीचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे दाखवता येतील. वयाचा पुरावा म्हणून सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रावर संपूर्ण जन्मतारीख नमूद असणे अनिवार्य आहे.एकूणच, १ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे पुणे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणे अधिक किफायतशीर ठरणार आहे.