केप टाऊन,
rabadas-world-record-of-350-wickets दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. अवघ्या १३ हजार ८०८ चेंडूंमध्ये ३५० बळी पूर्ण करत त्याने सर्वात कमी चेंडूंमध्ये हा टप्पा गाठणारा वेगवान गोलंदाज होण्याचा मान मिळवला. या कामगिरीसह त्याने दक्षिण आफ्रिकेचाच माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा विक्रम मागे टाकला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना केप टाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी रबाडाने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला धक्के दिले. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३८७ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. रबाडाने सुरुवातीलाच दोन फलंदाजांना माघारी धाडले. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडला बाद करत त्याने कसोटी कारकिर्दीतील ३५० बळींचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला.
या कामगिरीसाठी रबाडाने केवळ १३ हजार ८०८ चेंडू टाकले. यापूर्वी डेल स्टेनने १४ हजार ७१९ चेंडूंमध्ये ३५० बळी मिळवण्याचा विक्रम केला होता. पाकिस्तानचा वकार युनूस १४ हजार ९०५ चेंडूंसह या यादीत पुढे होता. वेस्ट इंडिजचे मॅल्कम मार्शल यांनी १६ हजार २८५, तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने १६ हजार ९०८ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता.
विशेष म्हणजे, रबाडाने आपल्या ७५व्या कसोटी सामन्यात ३५० बळींची कामगिरी पूर्ण केली. या बाबतीत तो मॅल्कम मार्शल यांच्या विक्रमाच्या बरोबरीने चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली आणि दक्षिण आफ्रिकेचे डेल स्टेन यांनी प्रत्येकी ६९ कसोटी सामन्यांत ३५० बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. डेनिस लिली यांनी ७०, तर ग्लेन मॅकग्रा यांनी ७४ कसोटी सामन्यांत हा टप्पा गाठला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळींचा आकडा गाठणारा रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी डेल स्टेन, शॉन पोलॉक आणि मखाया न्टिनी यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला होता. पहिल्या डावात केवळ एक बळी मिळवणाऱ्या रबाडाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे.