नवी दिल्ली,
Additional trains for Diwali travel दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुण्यातून अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ‘ट्रेन ऑन डिमांड’ (टीओडी) अंतर्गत हडपसर-नागपूर-हडपसर आणि लातूर-हडपसर-लातूर या मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत. हडपसर-नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४३ हडपसर-नागपूर विशेष ७ आणि १४ नोव्हेंबर २०२६ रोजी हडपसरहून सायंकाळी ४.०५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४४४ नागपूर-हडपसर विशेष ८ आणि १५ नोव्हेंबर रोजी नागपूरहून सायंकाळी ७.४० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०५ वाजता हडपसरला पोहोचेल.

हडपसर-नागपूर विशेष गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. परतीच्या गाडीला मूर्तिजापूर येथेही थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. त्यामध्ये २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर कार आणि १ एसएलआरडी डब्याचा समावेश आहे. दुसरीकडे, लातूर-हडपसर-लातूर विशेष गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४२९ लातूर-हडपसर विशेष २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी लातूरहून सकाळी ९.३० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता हडपसरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४३० हडपसर-लातूर विशेष याच तारखांना सायंकाळी ४.०५ वाजता सुटून रात्री ९.२० वाजता लातूरला पोहोचेल. या गाडीला हरंगुळ, मुरुड, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, जेऊर आणि दौंड येथे थांबे असतील. या गाडीची डब्यांची रचना २४ आयसीएफ डब्यांची असून, त्यात १ प्रथम वातानुकूलित, ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआरडी डबे असतील.
या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह आगाऊ आरक्षण १ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व संगणकीकृत प्रवासी आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या www\.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. गाड्यांमधील विनाआरक्षित प्रवासासाठी निर्धारित सामान्य द्वितीय श्रेणीचे (GS/LWS) आणि गार्ड-सामान डबे (SLRD/LSLRD) उपलब्ध असतील. या डब्यांसाठी यूटीएस ॲप किंवा रेल्वे तिकीट खिडकीवरून सुपरफास्ट, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना लागू असलेल्या नियमित दराने तिकीट काढता येईल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी मार्गावरील सर्व स्थानकांवरील गाड्यांच्या अचूक आगमन आणि प्रस्थानाच्या वेळा तपासाव्यात. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या www\.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाचा किंवा अधिकृत एनटीईएस ॲपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.