दौंड,
daund-market-diwali-traffic१ नोव्हेंबरदिवाळी सणामुळे बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी दौंड मर्चंट असोसिएशनने केली आहे. मुख्य बाजारपेठेतून अवजड वाहनांची वाहतूक रोखून पर्यायी मार्ग देणे, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करणे आणि पोलिस गस्त वाढवणे, अशा विविध मागण्या व्यापाऱ्यांनी बैठकीत मांडल्या.
सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यात अवजड वाहनांची ये-जा सुरू राहिल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी ग्राहक, व्यापारी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. बाजारपेठेत रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगचाही मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी.
वाहनांच्या पार्किंगला शिस्त लावून नागरिकांसाठी ये-जा सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली. दिवाळीच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्या तसेच वादविवादांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घ्यावी. मुख्य बाजारपेठेत नियमित गस्त वाढवून व्यापारी आणि ग्राहकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
----------------