रितेश देशमुख यांच्या एका वाक्याने मृणाल जाधव भारावली!

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
मुंबई
Riteish Deshmukh अभिनेता रितेश देशमुख केवळ आपल्या अभिनयामुळेच नव्हे, तर साधेपणा आणि उत्तम संस्कारांमुळेही नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या स्वभावातील आदरभाव आणि नम्रपणा अनेकांना भावतो. आता अभिनेत्री मृणाल जाधव हिने रितेश देशमुख यांच्यासोबतचा एक खास अनुभव सांगितला आहे. रितेश यांचा बोलण्यातील आदरभाव आणि प्रत्येक व्यक्तीला दिले जाणारे महत्त्व पाहून आपण भारावून गेल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे, वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी बोलतानाही रितेश कधीही एकेरी भाषेचा वापर करत नाहीत, असा खुलासाही मृणालने केला आहे.
 

Mrinal Jadhav Reveals Riteish Deshmukh 
रितेश देशमुख हे त्यांच्या संस्कारांसाठी आणि विनम्र स्वभावासाठी ओळखले जातात. दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत. देशमुख कुटुंबाला राज्याच्या राजकारणात मोठे स्थान आहे. मात्र, या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कोणताही बडेजाव न करता रितेश प्रत्येकाशी आदराने वागतात. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या असून, त्यांच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.
रितेश यांच्या स्वभावाबद्दल बोलताना मृणाल जाधव म्हणाली की, ते समोरच्या व्यक्तीचे वय, पद किंवा सामाजिक स्थान यांचा विचार न करता प्रत्येकाला सन्मानाने संबोधतात. वयाने कितीही लहान व्यक्ती असली, तरी ते तिला ‘तुम्ही’ असेच म्हणतात. त्यांच्या बोलण्यातील हा आदरभाव आणि संस्कार मनाला विशेष भावतात. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीशी अशा प्रकारे सन्मानाने संवाद साधणे ही त्यांच्या स्वभावातील अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचेही तिने सांगितले.
यावेळी मृणालने रितेश यांच्यासोबत घडलेला एक प्रसंगही सांगितला. ती एकदा रितेश यांना म्हणाली होती, ‘दादा, मी तुम्हाला तू म्हणते, मग तुम्ही मला तुम्ही का म्हणता?’ त्यावर रितेश यांनी दिलेले उत्तर तिच्या मनाला स्पर्शून गेले. ते म्हणाले, ‘नाही, मी तुम्हाला तुम्हीच म्हणणार. तू मला तू म्हणालीस तरी चालेल; पण मी तुम्हाला तुम्हीच म्हणणार आहे. हे माझे संस्कार आहेत.’
रितेश यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर आपल्याला आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट समजल्याचे मृणालने सांगितले. माणसाने आयुष्यात कितीही मोठे व्हावे, कितीही शिक्षण घ्यावे किंवा यश मिळवावे; मात्र आपल्या संस्कारांना कधीही विसरता कामा नये. प्रत्येक व्यक्तीशी आदराने बोलण्याची सवय कायम जपली पाहिजे, असा संदेश या प्रसंगातून मिळाल्याचे तिने नमूद केले. रितेश देशमुख यांच्या एका साध्या वाक्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रता आणि संस्कारांची झलक पाहायला मिळते, अशी भावना मृणालने व्यक्त केली आहे.