नागपूर,
nagpur-padyatraलोकशाही व्यवस्था, संविधानिक संस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात ‘लोकशाही वाचवा – अराजकता हटवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागपूर शहरात २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अभियानाची सांगता ५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात भव्य पदयात्रेने होणार आहे. या पदयात्रेत सुमारे १५ ते २० हजार नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अभियानाची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत देशव्यापी स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश मतदार यादीची शुद्धता आणि पारदर्शकता, पात्र नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत (SIR) जनजागृती तसेच लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास मजबूत करणे हा आहे. निवडणूक आयोग आणि संविधानिक संस्थांबाबत विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत संवाद
नागपूरमधील अभियानाची सुरुवात २ नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत आयोजित विशेष बैठकीने होणार आहे. या बैठकीत लोकशाही व्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकशाहीविषयक योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत विचारविनिमय होणार आहे.
३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी आणि तरुणांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील राजकीय घडामोडी, लोकशाही व्यवस्था, संविधानिक संस्था आणि लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयांवर विद्यार्थी व युवक आपले विचार मांडणार आहेत. याच दिवशी वसंतराव देशपांडे सभागृहात प्रबुद्ध नागरिकांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात लोकशाहीचे महत्त्व, लोकशाही व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि विरोधाच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या अराजकतेच्या प्रवृत्तीवर विचारमंथन होणार आहे.
चिटणवीस मैदानावर पाच हजार युवकांचा युवा संवाद
४ नोव्हेंबर रोजी चिटणवीस मैदान येथे सुमारे पाच हजार युवकांच्या सहभागातून ‘युवा संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे हे या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते असतील. या संवादातून युवकांशी लोकशाही, देशाची राजकीय परिस्थिती, संविधानिक मूल्ये, राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर संवाद साधण्यात येणार आहे.
विद्यार्थी, युवक, बुद्धिजीवी, शिक्षक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना लोकशाहीविषयक विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी या अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेने अभियानाची सांगता
अभियानाचा समारोप ५ नोव्हेंबर रोजी नागपुरात भव्य पदयात्रेने होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. यशवंत स्टेडियम येथून पदयात्रेला प्रारंभ होऊन ती संविधान चौक येथे पोहोचेल. या पदयात्रेत १५ ते २० हजार नागरिक सहभागी होण्याचे नियोजन आहे. संविधान चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने अभियानाची सांगता होणार आहे.
देशव्यापी अभियानांतर्गत पदयात्रा, राष्ट्र चिंतन संवाद, युवा संवाद, विद्यार्थी स्पर्धा, पत्रकार परिषदा आणि सोशल मीडिया उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये लोकशाहीविषयक जनजागृती करण्यात येत आहे. मतदार यादीची शुद्धता, SIR प्रक्रिया, पात्र नागरिकांचे मतदानाचे अधिकार आणि संविधानिक संस्थांची विश्वासार्हता या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे.
या अभियानात समाजातील सर्व घटकांनी, विशेषतः युवक, विद्यार्थी, बुद्धिजीवी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापौर नीता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार परिणय फुके, आमदार संजय भेंडे, सत्तापक्षनेते बाल्या बोरकर, भाजप महामंत्री श्रीकांत आगलावे, महामंत्री रितेश गावंडे, संपर्क महामंत्री विष्णू चांगदे, जयप्रकाश गुप्ता, अर्चना डेहनकर, पवन तिवारी, वैभव बावनकर आदी उपस्थित होते.