हॅमिल्टन,
vaibhav-suryavanshi भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील अखेरचा टी२० सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपल्या अंतिम अकरामध्ये बदल केले असले, तरी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा संधी मिळालेली नाही.
भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी गोलंदाजी विभागात दोन बदल केले आहेत. अक्षर पटेलच्या जागी वरुण चक्रवर्तीला, तर मयंक यादवच्या जागी अनुभवी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. वरुण चक्रवर्ती बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. त्याने यापूर्वी सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारला मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करण्याचे त्याचे लक्ष्य असेल.
नाणेफेकीनंतर बोलताना कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मागील चार सामन्यांत भारतीय संघाने धावांचा पाठलाग केला होता. त्यामुळे या वेळी प्रथम फलंदाजी करून खेळपट्टीचा अंदाज घेण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. ऑकलंडमधील पराभवाबाबत बोलताना त्याने मैदानाचा आकार वेगळा असल्याचे आणि काही फलंदाजांविरुद्ध गोलंदाजांना वेगळी रणनीती आखावी लागल्याचे स्पष्ट केले. मात्र, ग्लेन फिलिप्सने त्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केल्याचेही त्याने मान्य केले.
आगामी सामन्यात भारतीय संघ आपल्या नैसर्गिक शैलीत खेळण्यावर आणि ठरवलेल्या रणनीतीनुसार गोलंदाजी करण्यावर भर देणार असल्याचे अय्यरने सांगितले. संघात पुनरागमन करणाऱ्या वरुण चक्रवर्तीचेही त्याने कौतुक केले. वरुण आपल्या संधीची प्रतीक्षा करत होता. सामन्यापूर्वी संघाच्या बैठकीत त्याने केलेल्या उत्साहवर्धक भाषणामुळे खेळाडूंमध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे अय्यरने नमूद केले.
भारताची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन : टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर.