अफगाणिस्तानचा इतिहास! रहमत शाहची टॉप-१० मध्ये ऐतिहासिक झेप!

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
अफगाणिस्तान,
history-for-afghanistan अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रहमत शाह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत त्याने मोठी झेप घेत थेट सातवे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, कसोटी क्रमवारीतील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा रहमत शाह हा अफगाणिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
 
history-for-afghanistan
  
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रहमत शाहने केलेल्या दमदार फलंदाजीचा त्याला क्रमवारीत फायदा झाला. या सामन्यात त्याने १७३ धावांची शानदार खेळी साकारली. या कामगिरीमुळे त्याच्या क्रमवारीतील गुणांमध्ये वाढ होऊन रेटिंग ७३५ वर पोहोचले आहे. नव्या क्रमवारीत त्याने सहा स्थानांची प्रगती केली आहे. या कामगिरीदरम्यान रहमत शाहने भारताचा कर्णधार शुभमन गिल, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम आणि श्रीलंकेचा कामेंदू मेंडिस यांना मागे टाकले आहे. हे तिन्ही फलंदाज प्रत्येकी एका स्थानाने खाली घसरले आहेत. रहमत शाहचे हे कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले आहे.
 
दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट संघाची एकूण कामगिरीही अलीकडच्या काळात उंचावत आहे. झिम्बाब्वे आणि बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत संघाने एकदिवसीय क्रमवारीत सहावे स्थान गाठले होते. हे अफगाणिस्तानचे आतापर्यंतचे सर्वोत्तम स्थान आहे. याशिवाय संघाने त्रिकोणी मालिकेचे विजेतेपदही पटकावले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकीपटू रशीद खान याचेही आयसीसी क्रमवारीतील वर्चस्व कायम आहे. एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत तो ७६० रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज ६६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांच्या गुणांमध्ये मोठे अंतर असल्याने रशीदचे अव्वल स्थान कायम आहे. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही रशीद खान ७३१ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे रहमत शाहच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेटला कसोटी क्रमवारीत नवी ओळख मिळाली आहे.