लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरमध्ये एकत्र ३ हजार रुपये जमा होणार?

ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
मुंबई
Ladki Bahin Yojana राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे लक्ष आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांना नियमितपणे हा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला होता. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने हा हप्ता नेमका कधी जमा होणार, याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना आहे. त्यातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी मिळून महिलांच्या खात्यात थेट ३ हजार रुपये जमा होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
 

Ladki Bahin Yojana Will Women Get ₹3000 Together in December? October and November Installment Latest Update 
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांची दिवाळी कडू होऊ देणार नाही आणि त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यानंतर लाडक्या बहिणींनाही सणापूर्वी सन्मान निधी मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. महिलांच्या या मागणीची दखल घेत राज्य सरकारने दिवाळी सुरू होण्याआधीच त्यांच्या खात्यांमध्ये १ हजार ५०० रुपये जमा केले. मात्र, हा लाभ ऑक्टोबर महिन्याचा नसून सप्टेंबर महिन्याचा होता. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप बाकी आहे.
ऑक्टोबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या कालावधीतही सरकारकडून हप्ता वितरित झाला नाही, तर महिलांना ऑक्टोबर महिन्याची रक्कम थेट डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात सरकार हप्त्याबाबत काय निर्णय घेते, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा सलग दोन महिन्यांचा सन्मान निधी महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे वितरित केल्यास पात्र महिलांच्या खात्यात एकाच वेळी ३ हजार रुपये जमा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते डिसेंबरमध्ये एकत्र देण्याचा निर्णय घेतल्यासच महिलांना ३ हजार रुपयांचा लाभ मिळू शकणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी देण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. तसेच डिसेंबरमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा केले जातील, अशी घोषणाही सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अधिकृत निर्णयाचा आधार नाही. महिलांनी हप्त्याच्या तारखेबाबत किंवा एकत्रित रक्कम मिळण्याबाबत कोणत्याही अपुष्ट माहितीवर विश्वास न ठेवता राज्य सरकारकडून जारी होणाऱ्या अधिकृत सूचना आणि घोषणांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.