आशिया कपसाठी भारत-पाकिस्तान महामुकाबला!

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
india-vs-pakistan क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला पाहायला मिळणार आहे. एसीसी १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. भारतीय युवा संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता पाकिस्तानला नमवून विजेतेपद पटकावण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर असेल.

india-vs-pakistan
विशेष म्हणजे, गटसाखळी सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय खेळाडूंकडे आहे. भारताने २०२१ पासून या स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही. मागील दोन अंतिम सामन्यांमध्येही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, पाकिस्तान गतविजेता असल्याने विजेतेपद कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.
अफगाणिस्तानवर मात करत भारताची अंतिम फेरीत धडक
उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत आठ गडी गमावून २२७ धावा केल्या. भारताकडून इशान सूदने प्रभावी गोलंदाजी करत ४३ धावांत तीन बळी मिळवले. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या १७ षटकांत ११७ धावांची भागीदारी केली. आर्यवीरने ५१ धावांचे योगदान दिले. तर लक्ष्यने ९० चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि एका षटकारासह ९३ धावा फटकावल्या. त्यानंतर व्ही. के. विनीतने नाबाद ५७ धावांची खेळी करत यशवर्धनच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने ३६.५ षटकांत दोन गडी गमावून २३० धावा करत आठ विकेट्सने सामना जिंकला. दुसरीकडे, पाकिस्तानने उपांत्य फेरीत बांगलादेशला नऊ गडी राखून पराभूत केले. त्यामुळे आता आशिया कपच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.
भारत-पाकिस्तान अंतिम सामना कधी आणि कुठे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ चा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावरील मिनिस्ट्री टर्फ-२ येथे हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी सकाळी १० वाजता नाणेफेक होणार आहे.
थेट प्रक्षेपण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे पाहाल?
या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तसेच मोबाईल, लॅपटॉप आणि इतर उपकरणांवर सामना पाहण्यासाठी सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील विजेतेपदाची लढत घरबसल्या पाहता येणार आहे.