मुंबई
Kurla Murder Case दिवाळीच्या सणादरम्यान मुंबईतील कुर्ला परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हलावपूल परिसरात विनोद मल्लप्पा पवार (४०) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विनोद याचा मोठा भाऊ बाबा पवार याचीही अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची अल्पावधीत हत्या झाल्याने संतप्त पवार कुटुंबीयांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संशयित आरोपीला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाल्याने पोलिसांशी कुटुंबीयांची बाचाबाची झाली.
कुर्ल्यातील माकडवाला कंपाउंड परिसरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्वावरून संघर्ष सुरू असल्याची माहिती आहे. याच वादातून सहा महिन्यांपूर्वी बाबा पवार याची प्रतिस्पर्धी गटाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता त्याच कुटुंबातील विनोद पवार याचीही हत्या झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी विनोद पवार हा हलावपूल परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ आला होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनोदला तातडीने कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पोहोचून तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा केले. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सहा महिन्यांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची हत्या झाल्याने पवार कुटुंबीय संतप्त झाले. आपल्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. संशयित आरोपीला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले असता संतप्त कुटुंबीयांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हटणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तब्बल १२ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. रात्री उशिरापर्यंत हत्येतील आरोपी फरार असल्याची माहिती होती. मात्र, या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू असून, पूर्ववैमनस्यातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
विशेष म्हणजे, पवार कुटुंबातील दोन्ही गटांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे सांगितले जात आहे. मृत विनोद पवार याच्याविरोधातही यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे या हत्येमागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोणाच्या सांगण्यावरून आले होते आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. सहा महिन्यांत एकाच कुटुंबातील दोन हत्या झाल्याने या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.