वाशीम
Shri Kushmand Navami Mahotsav वाशीम येथे १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर पर्यंत श्री वासुदेव आश्रमात श्री कूष्मांडनवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा श्री कूष्मांडनवमी महोत्सव म्हणजे भक्ती, ज्ञान, आणि संस्कृतीचा संगम असणार , असे मत प. पू. विजय काका पोफळी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना व्यक्त केले.

याबाबत अधिक माहिती देतांना विजयकाका पोफळी महाराज म्हणाले की, वाशीमकरांसाठी आठवडाभर चालणारा हा अध्यात्मिक महोत्सव म्हणजे अनमोल विचाराची देणगी असेल. कारण या महोत्सवात वेदमुर्ती अनंतशास्त्री मुळे, प्रधानाचार्य वेदमुर्ती श्री कृष्णशास्त्री आळंदीकर यांच्यासारखे अन्य मोठे संत भक्तगणांना चारही वेदाचे मार्गदर्शन करणार आहेत. सात दिवस चालणार्या श्रीमद् भागवत कथेच्या माध्यमातून विविध पौराणिक प्रसंग, संतचरित्रे आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनचरित्राचे निरूपण केले जाणार आहे, अशी माहिती विजयकाका पोफळी यांनी दिली.
महोत्सवाचा शुभारंभ रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता पीठस्थापनेने होणार आहे. सकाळी ७.३० वाजता श्रीमद् भागवत संहिता पठण, ऋग्वेद संहिता स्वाहाकार आणि चतुर्वेद पारायणाला प्रारंभ होईल. या धार्मिक अनुष्ठानात भागवत कथा वेदमूर्ती अनंतशास्त्री मुळे श्री क्षेत्र आळंदी (देवाची), जि. पुणे तसेच इतर वेदमूर्तींचा सहभाग राहणार आहे. पहिल्या दिवशी भागवत माहात्म्य, गोकर्ण माहात्म्य आणि मंगलाचरण या विषयांवर कथानिरूपण होणार आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी नैमिषारण्यातील सूत-शौनक संवाद, नारद-व्यास चरित्र आणि शुक-परीक्षित संवाद या विषयांचे निरूपण करण्यात येईल. मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी कपिलगीता, सतीचरित्र, ध्रुवचरित्र, जडभरत चरित्र, श्री नृसिंह अवतार आणि प्रल्हाद चरित्र या भक्तिप्रधान प्रसंगांची कथा भाविकांना ऐकायला मिळणार आहे. बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी गजेंद्रकथा, वामन अवतार, अंबरीष चरित्र, गंगावतरण, श्रीराम कथा आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे निरूपण होणार आहे. दुपारी ३ वाजता श्री भागवत कथा ज्ञानयज्ञ निरुपण, १८ नोव्हेंबर ला सकाळी ९ वाजता श्री स्वानंद पुंड (वणी) यांच्या १०० व्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, यावेळी जगद्गुरु शंकराचार्य, संकेश्वर पीठ व श्री महेश सूर्यवंशी अध्यक्ष दगडुशेठ हलवाई, गणेशपेठ संस्थान पुणे, यांची उपस्थिती लाभणार आहे.
गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण लीला, माखन चोरी, उलूखल बंधन, गोचारण लीला, गोवर्धन पूजन, ५६ भोग आणि दीपोत्सव असे विविध भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत. तर शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी मथुरालीला, कंसवध, द्वारिकालीला, श्रीकृष्ण-रुमिणी विवाहसोहळा, सुदामाचरित्र आदी विषयांवर कथानिरूपण होणार आहे. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी नवयोगेश्वर संवाद, उद्धवगीता आणि परीक्षित उद्धार या विषयांचे निरूपण करून श्रीमद् भागवत कथेची सांगता होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला प.पू. सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंहभारती स्वामी शंकराचार्य (संकेश्वर-कर्वीर) पीठ यांची पूर्णवेळ उपस्थिती लाभणार आहे. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता पूर्णाहुती होऊन महोत्सवाची सांगता होणार आहे. शहरासह जिल्ह्यातील भाविक, धर्मप्रेमी नागरिक आणि भक्तमंडळींनी या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विजयकाका पोफळी यांनी केले आहे.