...अन् घरोघरी रुजली तुळस !

tulasi-queen-of-herbs विद्यार्थ्यांचा सहभाग

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
नागपूर, १६ नोव्हेंबर
 
tulasi-queen-of-herbs भारतीय संस्कृतीत तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे आपण जाणतोच. ‘क्विन ऑफ हर्ब्स’ असे वैज्ञानिक बिरूद मिरविणारी तुळस आपल्या परंपरांमध्ये सहज अनुस्युत करण्यात आली आहे. याचे श्रेय आपल्या तर्कनिष्ठ पूर्वजांना द्यायला हवे. हवा शुद्ध करणारी तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवते, श्वसन यंत्रणा सुदृढ करण्यासह कॉर्टीसॉल ३६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत करते. अशी ही बहुगुणी तुळस ‘तुळस लावा, पर्यावरण वाचवा’ या अभियानातून विदर्भाच्या सर्व ११ जिल्ह्यांमध्ये आनंदाने रुजली आणि डौलात बहरली.
 
 
tulasi-queen-of-herbs तरुण भारतच्या या उपक्रमात एकूण १,७५१ कार्यक्रम घेऊन एक लाखांवर तुळशीची रोपे नि:शुल्क वितरीत करून रुजविण्यात आली. त्यात सर्वाधिक ४६० कार्यक्रम नागपूर शहरात घेण्यात आले. तुळशीच्या असंख्य बियाही छोट्या पाकीटांमधून तरुण भारतासह घरोघरी वितरीत करण्यात आल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळस अभियानाची संकल्पना उचलून धरली आणि शुभेच्छा दिल्या. शिवाय, अंजनगाव सुर्जीच्या देवनाथ पीठाचे पिठाधीश स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनीही शुभेच्छा देत, त्यांच्या आश्रमात तुळस लावून अभियानात सहभाग घेतला. शिक्षण विभागाच्या सहकार्यातून ‘एक विद्यार्थी, एक तुळस रोप’ हे अभियान राबविल्याने, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यातून आपल्या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांच्या मनात दृढ झाली आणि पर्यावरण संवर्धनात योगदान देण्यास प्रोत्साहन मिळाले.
 
 
tulasi-queen-of-herbs तुळस रुजली आणि कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेदरम्यान, विदर्भाच्या सर्व ११ जिल्ह्यांमधील १२० तालुके आणि ४५० गावांमध्ये १० हजारांवर तुळशी विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले, हे विशेष! या माध्यमातून धार्मिक मूल्यांची जपणूक आणि नव्या पिढीकडे त्यांचे हस्तांतरण सहज झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेल्या पंचसूत्रीचे यशस्वी पालन करून, पर्यावरणाचा शाश्वत विकास, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक एकाेप्याची भावना सुदृढ झाली.
tulasi-queen-of-herbs वाढत्या प्रदूषणावरील सर्वोत्तम उपाय असलेली तुळस आता मनात रुजवून, तुळशी विवाहाचा धार्मिक सोहळा जनचळवळ होण्याची गरज आहे. मानव आणि निसर्गातील नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी आणि तुळशी विवाह सोहळ्याचा दरवळ सर्वदूर पसरविण्यासाठी यावर्षीही गावोगावी तुळशी विवाह सोहळ्यांचे आयोजन आपापल्या स्तरावर करण्याचे आवाहन तरुण भारत आपल्या वाचकांना करीत आहे.
 
 
tulasi-queen-of-herbs तरुण भारतच्या शताब्दी वर्षानिमित्त गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये ‘तुळस लावा, पर्यावरण वाचवा’ हा अभिनव उपक्रम आयोजिण्यात आला. विविध संस्था, शाळा, मंदीरे, गुरूद्वारा, बुद्धविहार आणि घरोघरी तुळशीच्या बिया आणि रोपांचे वाटप तरुण भारतच्या पुढाकारातून करण्यात आले. या रुजलेल्या तुळशी रोपांचे सामूहिक विवाह सोहळे अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात धडाक्यात साजरे झाले. संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी पुढाकार घ्या. यावर्षीही तुमच्या घरी, अपार्टमेंट्समध्ये, मंदीर परिसरात, संस्थेच्या प्रांगणात तुळशी विवाह सोहळ्यांचे आयोजन गावात-शहरात आपापल्या स्तरावर नक्की करा.