१५ राज्यांना पावसाचा इशारा

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
cyclone akvan alert
देशभरातील हवामानात सध्या वेगाने बदल होत असून, एकीकडे उत्तर भारतात थंडी आणि दाट धुक्याचा प्रभाव वाढत आहे, तर दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) १९ नोव्हेंबर रोजी झारखंड, बिहार, ओडिशासह देशातील १५ राज्यांना पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. काही भागांत वाऱ्यांचा वेग ताशी ८५ ते ९० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील राज्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.



दक्षिण आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अकवान' या तीव्र चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. २० नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश, यानम आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीदरम्यान मच्छलीपट्टणम आणि पुरीच्या आसपास हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर, तर वाऱ्यांच्या जोरदार झोतांचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे १९ आणि २० नोव्हेंबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि ओडिशामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याबरोबरच वेगवान वारे वाहण्याचा धोका असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओडिशातील परिस्थिती लक्षात घेता किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, झारखंड, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या १५ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. झारखंडमधील रांची, धनबाद, देवघर, बोकारो, हजारीबाग, पलामू आणि रामगड जिल्ह्यांना पाऊस व जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये पाटणा, भोजपूर, बक्सर, भागलपूर, पूर्णिया, सुपौल, दरभंगा, मधुबनी आणि किशनगंजसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता आहे.

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांत मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या काही भागांत वाऱ्यांचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. आंध्र प्रदेशला मात्र चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये १९ नोव्हेंबर रोजी थंडीसह दाट धुक्याचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज आहे. राजधानीचे कमाल तापमान २६ अंश, तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, मेरठ, नोएडा, आग्रा, कानपूर, वाराणसी, प्रयागराज, गोरखपूर आणि जौनपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान प्रतिकूल राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या विविध भागांतही थंडी व दाट धुक्याचा प्रभाव वाढू शकतो.

डोंगराळ राज्यांमध्येही हवामान बदलत असून, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात थंडी व दाट धुक्याबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील नैनीताल, चमोली, पिथौरागड, चंपावत आणि पौडी गढवाल या भागांत हवामानाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा, किन्नौर, कांगडा, मंडी, सोलन आणि लाहौल-स्पिती येथेही थंडी वाढण्याचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत बर्फवृष्टीसह हवामान खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे डोंगराळ भागांत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांनी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.