नवी दिल्ली
delhi accident राजधानी दिल्लीतील काश्मिरी गेट परिसरात भरधाव फॉर्च्युनर कारने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. १७ आणि १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री युधिष्ठिर सेतूवर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर सर्व आठ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांनी प्राण गमावले. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी फॉर्च्युनर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील युधिष्ठिर सेतूवर फॉर्च्युनर आणि टीएसआर ऑटोरिक्षाची जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण आठ जण जखमी झाले होते. सुरुवातीला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१ आणि १२५ अ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. मात्र, उपचार सुरू असताना दोन जखमींचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यामुळे पोलिसांनी मूळ एफआयआरमध्ये बीएनएस कलम १०५ अर्थात सदोष मनुष्यवधाच्या कलमाची भर घातली. आरोपी फॉर्च्युनर चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, ईशान्य दिल्लीतील भजनपुरा परिसरात गुरुवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. भजनपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गमरी गावात सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळला. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दुसरीकडे, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ मध्ये वैध प्रवास कागदपत्रांशिवाय जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी पकडले. बुधवारी दुपारी ही घटना घडली. संबंधित तरुणाने आवश्यक प्रवास कागदपत्रे नसतानाही टर्मिनलमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या सीआयएसएफ जवानांनी काही सेकंदांतच त्याला रोखून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले.
या तरुणाची ओळख हरियाणातील सोनीपत येथील कुणाल अशी झाली आहे. तो खेळाडू असून पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षण घेत आहे. प्राथमिक चौकशीत त्याला कोणत्याही परिस्थितीत परदेशात जायचे होते, अशी माहिती समोर आली आहे. त्याने विमानतळाच्या सुरक्षाव्यवस्थेतून जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला, यासह अन्य बाबींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.