मुंबई
samreen kaur भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि त्याची प्रेयसी, मॉडेल-अभिनेत्री समरीन कौर यांच्या नात्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अर्शदीपसोबतच्या नात्यावरून समरीनला ट्रोल करणाऱ्या एका युजरने ती प्रसिद्धी आणि पैशांसाठी क्रिकेटपटूला डेट करत असल्याचा आरोप केला होता. या टीकेला समरीनने आता चोख प्रत्युत्तर दिले आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर सविस्तर पोस्ट शेअर करत तिने सोशल मीडियावरील दुटप्पीपणावर बोट ठेवले. विशेष म्हणजे, समरीनच्या या भूमिकेला अर्शदीपनेही उघडपणे पाठिंबा दिला आहे.

समरीनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये समाजमाध्यमांवरील लोकांच्या दुटप्पी वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “या जगाचे जितके अधिक निरीक्षण करते, तितके सोशल मीडियावरील लोक किती ढोंगी आहेत, याची जाणीव होते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुप्त ठेवले, तर तुम्हाला त्यांचा अभिमान नाही, असे म्हटले जाते. मात्र, प्रेम उघडपणे व्यक्त केले, तर ते प्रसिद्धीसाठी असल्याची टीका केली जाते. स्वतःची काही तत्त्वे आणि अपेक्षा असतील, तर तुम्हाला स्वार्थी ठरवले जाते. एखाद्यावर मनापासून प्रेम केले, तरी एक दिवस तुम्ही त्याला सोडून द्याल, असे म्हटले जाते.”
आपल्या आर्थिक स्वावलंबनाबाबतही समरीनने स्पष्ट भूमिका मांडली. “मी वयाच्या १७ व्या वर्षापासून काम करत आहे. त्यामुळे मला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. आतापर्यंत २० हून अधिक देशांचा प्रवास केला असून, स्वतःचे आयुष्य स्वतः घडवले आहे. देवाच्या कृपेने लहानपणापासूनच मी माझी जीवनशैली सांभाळू शकले आहे. त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाही स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही,” असे तिने ठामपणे सांगितले.
अर्शदीपसोबतच्या नात्याबद्दल भावना व्यक्त करताना समरीन म्हणाली, “अर्शदीपमुळे माझे आयुष्य पूर्ण होते. अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. माझ्या पोस्टमुळे ज्यांना अडचण होत असेल, त्यांनी माझे पेज सोडून जावे.” अशा शब्दांत तिने टीकाकारांना सुनावले.
दरम्यान, समरीनच्या या पोस्टनंतर samreen kaur अर्शदीप सिंगनेही तिच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्याने समरीनची पोस्ट स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पुन्हा शेअर केली आणि ट्रोलर्सना इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला. “मला तुझा अभिमान आहे, बेबी. तू खूप कणखर आहेस. आपल्या नात्याबद्दल विनाकारण काळजी करणाऱ्यांनी थोडे थांबावे. जगा आणि जगू द्या. इंटरनेट आणि जग अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. प्रेम पसरवा आणि इतरांनाही आनंदी राहू द्या,” असे अर्शदीपने लिहिले.
पुढे समरीनबद्दलचे प्रेम व्यक्त करताना त्याने म्हटले की, समरीनसारखी निर्मळ मनाची आणि प्रेमळ जोडीदार आयुष्यात मिळाल्याबद्दल तो देवाचे आभार मानतो. अशा प्रकारे सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देताना समरीनने स्वतःच्या स्वावलंबनाचा मुद्दा मांडला, तर अर्शदीपनेही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या नात्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.