उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींच्या भावनिक अभिनयाची झलक

दोन भावांच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :02-Nov-2026
Total Views |
मुंबई
bandhu trailer out ‘भाऊ काय, बंधू काय… जणू दूध आणि साय!’ गीतकार गुरु ठाकूर यांच्या या शब्दांतून भावाभावांमधील नात्याची सुंदर अनुभूती मिळते. कधी भांडणं, कधी रुसवे-फुगवे, तर कधी एकमेकांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छांनाही बाजूला ठेवणं, अशा अनेक भावनांनी हे नातं गुंफलेलं असतं. मतभेद आणि दुरावा निर्माण झाला, तरी मनाच्या एका कोपऱ्यात भावासाठी असलेली जागा कधीच कमी होत नाही. याच प्रेमाची, त्यागाची आणि अतूट भावबंधांची कहाणी सांगणाऱ्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रभावी अभिनयाची झलक दाखवणारा हा ट्रेलर दोन भावांच्या नात्यातील भावनिक पैलू उलगडतो.
 

bandhu trailer out upendra limaye and jitendra joshi’s marathi film to release on november 20 
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच या ट्रेलरने ट्रेंडिंगमध्ये स्थान मिळवले. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रजत बेदी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी सांभाळली आहे. ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांनंतर नितीन सुपेकर पुन्हा एकदा मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि भावविश्व मांडणारी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत.
चित्रपटात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांच्या प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत. याशिवाय रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे, बालकलाकार शौर्य पाटील, देवा गाडेकर, वर्षा अजित, प्रशांत जाधव, अनिल कांबळे आणि प्रणाली भालेराव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या निर्मितीशी जोडलेल्या प्रत्येक कलाकाराने आणि तंत्रज्ञाने आपले योगदान मनापासून दिले आहे. रजत बेदी यांचे प्रस्तुतकर्ता म्हणून लाभलेले पाठबळ आणि संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांतून ही कलाकृती साकारली आहे. भावाभावांमधील नात्याचे विविध रंग प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतील, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.
चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता रजत बेदी म्हणाले, “चांगल्या कथा भाषेच्या सीमा ओलांडून प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतात. ‘बंधू’ची कथाही अशीच मनाला भिडणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेमाशी जोडले जाणे माझ्यासाठी विशेष अनुभव आहे. उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयातून या नात्याचे भावविश्व जिवंत केले आहे. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला आपलेसे करावे, अशी अपेक्षा आहे.”
दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आगामी प्रदर्शनासाठी आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
‘बंधू’मधील गीतांनाही विशेष महत्त्व आहे. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी गीतलेखन केले असून, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे. लोकप्रिय गायक अजय गोगावले, अतुल गोगावले, अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या आवाजाने ही गीते सजली आहेत. चित्रपटातील गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.
चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची जबाबदारीही अनुभवी कलाकारांनी सांभाळली आहे. अविनाश नलावडे आणि नील राठोड यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. कीर्ती जंगम यांनी वेशभूषा, तर समीर रमेश कदम यांनी रंगभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. हर्षद आत्माराम गायकवाड यांनी छायांकन केले असून, योगेश कोळी यांनी अतिरिक्त छायांकन केले आहे. वैभव दाभाडे आणि वासिम मुल्ला यांनी संकलन केले असून, साहसदृश्यांची आखणी बब्बू खन्ना यांनी केली आहे.
एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणाऱ्या दोन भावांची ही कथा नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. दमदार कलाकारांची फळी, भावनिक कथानक आणि सुरेल संगीत यांची सांगड घालणारा ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.