वर्धा,
vidya-vachaspati-pund रामायण सर्वांना माहीत आहे. मात्र, रामाचे चरित्र समजून घेऊन त्यातील आदर्श आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. रामचरित्र हे अनुकरणीय असून प्रत्येकाने श्रीरामाचे आचरण आजच आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे. यासोबतच भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्याचे संवर्धन करण्याची नितांत गरज आहे, असे मार्गदर्शन विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांनी केले. स्थानिक गोल बाजार परिसरातील श्रीराम मंदिर देवस्थानच्या सभागृहात चातुर्मास समाप्तीनिमित्त भारतीय संस्कृती राम चरित्र सामाजिक मूल्य आणि वर्तमान परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले की, राम नेमके कसे होते, त्यांच्या जीवनातील आदर्श कोणते होते आणि त्यांनी समाजासमोर कोणता आदर्श ठेवला, याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे. केवळ परंपरा जपणे पुरेसे नसून त्या परंपरेमागील विचार आणि संस्कारही पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. प्रत्येक घरात रामचरित्रातील आदर्शांचे अनुकरण करणारी व्यक्ती असणे गरजेचे आहे. भारत महान आहे. मात्र, भारतातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आचरणातून महान झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय प्राचीन साहित्याचा महिमा आणि भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये विशद करताना त्यांनी धर्म, अर्थ आणि जीवनमूल्यांचा सुंदर समन्वय भारतीय संस्कृतीने स्वीकारल्याचे सांगितले. आज माणसाची दृष्टी बदलत चालली असून भौतिक सुखांच्या मागे धावताना तो मानसिक समाधान आणि आत्मिक सुखापासून दूर जात आहे. त्यामुळे समर्थांच्या विचारांची आणि संस्कारमूल्यांची आजच्या समाजाला अधिक आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
गोसेवा आणि गोरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येकाने गोसंवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. माणसाने वैज्ञानिक क्षेत्रात मोठी प्रगती केली असली तरी त्याच प्रमाणात वैचारिक आणि भावनिक प्रगती झालेली दिसत नाही. नियोजनशून्य कारभार आणि चुकीच्या दृष्टिकोनामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे संवर्धन करून जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन मधुकर जोशी यांनी केले. धनंजय बल्लाळ यांनी आभार मानले तर प्रास्ताविक विजय धाबे यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक व प्रसिद्ध नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. प्रसाद देशमुख, श्रीराम मंदिर देवस्थानचे सचिव संजीव लाभे, साई मंदिराचे अध्यक्ष विठ्ठल व्यवहारे, गणपती मंदिराचे अध्यक्ष सुरेश भडांगे, मनोज पाचखेडे, विवेक साखरकर, सुधीर भूत, प्रशांत जोशी, अॅड. हर्षवर्धन देशमुख, आदींसह वर्धेकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.