सेलू,
bor tiger reserve तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील निसर्गसौंदर्य, समृद्ध जैवविविधता आणि जंगल सफारीचे आकर्षण आता विदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. बोर जंगलाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून देशांतर्गत पर्यटकांसोबतच परदेशातूनही पर्यटक या निसर्गरम्य परिसराला भेट देण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवार २२ रोजी जर्मनीतील पर्यटक टियागो रामोस दास सँटोश यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील बोरधरण सफारी गेटवरून जंगल सफारीचा आनंद घेतला. रविवारी सुटीचा दिवस असल्याने बोरधरण सफारीसाठी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरातील सफारीसाठी उपलब्ध असलेल्या १६ जिप्सींचे बुकिंग शंभर टक्के पूर्ण झाले होते.

बोर व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनासाठी विदेशी पर्यटकांचा ओढा वाढत असल्याचे दिसुन आले. सकाळी अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका येथील पर्यटकही बोर जंगल सफारीचा अनुभव घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जर्मनीनंतर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील पर्यटकांची भेट बोर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.बोर व्याघ्र प्रकल्पातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण, जंगलातील विविध वन्यजीव, पक्ष्यांची विविधता तसेच बोरधरण परिसराचे सौंदर्य पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. शहरांच्या धकाधकीपासून दूर जंगलाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्याची संधी मिळत असल्याने पर्यटकांकडून या सफारीला पसंती दिली जात आहे, असे जुन्या बोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांनी सांगितले.
विदेशी पर्यटकांच्या वाढत्या भेटींमुळे बोर व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. विदेशी पर्यटकांचा वाढता प्रतिसाद हा स्थानिक पर्यटन व्यवसाय, सफारीशी संबंधित सेवा आणि परिसरातील रोजगाराच्या संधींसाठीही सकारात्मक ठरू शकतो.रविवारी सर्व १६ जिप्सींचे शंभर टक्के बुकिंग तर दुसरीकडे जर्मनी, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका अशा विविध देशांतील पर्यटकांची उपस्थिती यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाची ओळख आता विदेशापर्यंत पोहोचली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.