भेंडाळ्यात एक कोटीच्या स्मार्ट प्रकल्पाचा शुभारंभ

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
गडचिरोली,
smart-project-in-bhendale चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे मुलचेरा येथील शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुमारे 1 कोटी 4 लाख रुपयांच्या ’स्मार्ट’ प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकर्‍यांना बियाणे स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगसारख्या अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत.
 
 
smart-project-in-bhendale
 
कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत आत्मा, गडचिरोलीच्या जिल्हा अंमलबजावणी कक्षामार्फत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. भेंडाळा येथे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात यंत्रसामग्रीसाठी शेड, बियाणे स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा तसेच पॅकेजिंग यंत्रसामग्रीचा समावेश आहे. उद्घाटनप्रसंगी नागपूर विभागाच्या ’स्मार्ट’ प्रकल्पाच्या विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या प्रमुख तथा ’आत्मा’ च्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर आणि जिल्हा नोडल अधिकारी अर्चना कोचरे यांची उपस्थिती होती. कडधान्यांची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंग केल्याने शेतमालाचे मूल्य वाढते आणि त्याला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होते.
 
 
परिसरातील शेतकर्‍यांचा शेतमाल सामूहिकरीत्या संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि बाजारपेठेशी थेट जोडणी करणे यावर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ठोस भर द्यावा, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. या कार्यक्रमास विभागीय अंमलबजावणी कक्षाचे वित्तीय प्रवेश सल्लागार सत्यपाल ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे, चामोर्शीचे तालुका कृषी अधिकारी तुमडाम आणि मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक, सभासद आणि बहूसंख्येने शेतकरी उपस्थित होते.