शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्या

राकाँ (शप) गटाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
वर्धा,
make-water-available-to-farmers-for-irrigation जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाच्या वतीने आज २३ रोजी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना निवेदन देण्यात आले. वर्धा जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून या भागातील हजारो शेतकर्यांची शेती सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून गहू, हरभरा, चणा सह भाजीपाला तसेच इतर पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, अद्याप कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
 
make-water-available-to-farmers-for-irrigation
 
वडगाव प्रकल्प तसेच नांद (शेटेश्वर) प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावांतील शेतकरी सध्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकांची लागवड केली. मात्र, ऐन गरजेच्या वेळी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विहिरी व बोअरवेलच्या मर्यादित पाण्यावर संपूर्ण शेती करणे शक्य नसल्याने कालव्याचे पाणी वेळेत मिळणे गरजेचे आहे. यासंदर्भात १३ नोव्हेंबर रोजी हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, निवेदन देऊनही आजपर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
 
 
जिल्हा प्रशासनाने तातडीने संबंधित पाटबंधारे व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वडगाव व नांद (शेटेश्वर) प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करावे. तसेच हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वेसह वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकर्यांना रब्बी पिकांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून द्यावे. कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकर्यांनाही समान न्यायाने पाणी मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी यावेळी दिला. निवेदन देताना प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, महेश झोटिंग पाटील, मिलिंद हिवलेकर, राजेंद्र शर्मा, संदीप किटे, योगिता इंगळे, प्रणय कदम, संजय नेहारोत्रा, प्रशांत घवघवे, प्रवीण पेठे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.