यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत भर!

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
dhruv-rathee प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याच्या अडचणी वाढल्या असून, दिल्लीतील साकेत न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. २०१८ मध्ये दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने ही कारवाई केली आहे. ध्रुव राठी सध्या जर्मनीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
 
dhruv-rathee
 
या प्रकरणाची सुरुवात मे २०१८ मध्ये ध्रुव राठीने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या 'BJP IT Cell Part II' या व्हिडिओमुळे झाली. या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने आपली बदनामी करण्यासाठी एका व्यक्तीला पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राठीने केला होता. हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हा व्हिडिओ रिट्विट केला होता.
 
या व्हिडिओवरून तक्रारदार विकास संकृत्यायन यांनी ध्रुव राठीविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. राठीने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याबद्दल खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, त्याचाच भाग म्हणून आता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
 
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात न्यायालयाने ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र, त्याला नोटीस बजावण्यासाठी संबंधित ठिकाणी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना त्याचा पत्ता बंद असल्याचे आढळले. त्यानंतर न्यायालयाने पुढील कारवाई करत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
 
दरम्यान, ध्रुव राठी ८ ऑक्टोबर रोजी भारतात आला होता. दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा त्याने इरादा व्यक्त केला होता. मात्र, आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील निवासस्थानातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. आता साकेत न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटनंतर ध्रुव राठीच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, ३ डिसेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.