डिसेंबरपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
गडचिरोली,
resolution-of-independent-vidarbha-state विदर्भ राज्य आंदोलन समितीने (विराआंस) ‘मिशन 2027’ अंतर्गत 31 डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विदर्भाच्या मागणीचे आंदोलन केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी 7 डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर दुपारी 12 वाजता ‘हल्लाबोल आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भातील नागरिक, युवक-युवती आणि महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तालुका कार्यकारिणी बैठकीत करण्यात आले.
 
 
resolution-of-independent-vidarbha-state
 
विदर्भातील 11 जिल्ह्यांतील 120 तालुक्यांमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी समितीच्या वतीने जिल्हावार व विभागवार ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प’ मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत 27 डिसेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता गोंदिया येथे ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प महिला मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. बैठकीत नागपूर करारातील आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 28 सप्टेंबर 1953 रोजी झालेल्या नागपूर करारानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी विदर्भ द्विभाषिक मुंबई राज्यात सामील झाला. मात्र, करारातील आश्‍वासनांनुसार विदर्भाचा अपेक्षित विकास झाला नसल्याची भूमिका समितीने मांडली. संविधानातील कलम 371(2), वैधानिक विकास मंडळांची स्थापना, सिंचन निधीतील वाटा आणि विकासाचा अनुशेष यांचा संदर्भ देत विदर्भातील 131 धरणांची कामे अपूर्ण राहिल्याने सुमारे 14 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नसल्याचे समितीने नमूद केले. दरम्यान, कुरखेडा तालुक्याची बैठक 22 नोव्हेंबर रोजी उत्तर गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर यांच्या आयोजनात पुराडा गावातील ग्रामपंचायत भवन येथे घेण्यात आली. या बैठकीला गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुकाध्यक्ष रामचंद्र रोकडे, श्यामराव वाघाडे, रामचंद्र कोडापे, हेमंत कुमार मरकाम, चुनेश्‍वर मानकर, बुधराम साहाळा, सोवीतराम सोंजाल, गोविंदा पुराम, मदनसिंग ब्राह्मनायक यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.