समुद्रपूर,
vijaya nighot पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केल्यास आर्थिक प्रगतीचा मार्ग कसा सुकर होतो याचे उदाहरण समुद्रपूर येथील निघोट कुटुंबाने दाखवून दिले आहे. पतीच्या निधनानंतर पाठच्या भावाने हातभार लावला. पतीच्या उणीव भरून निघणे शक्य नव्हते. पण, मुलं मोठी झाली. भाऊ आणि सासर्यांच्या मदतीने १ गाय, १ म्हशीवर सुरू केलेला व्यवसाय आता ३० दुधाळ जनावरांपर्यंत पोहोचला. पतीच्या निधनानंतर हातावर हात ठेऊन बसण्यापेक्षा शेतीला पुरक असा दुग्ध व्यवसाय सुरू केला. हाच व्यवसाय कुटुंबाचा आधार झाला असल्याची माहिती विजया निघोट यांनी दिली.

येथील प्रगतशील शेतकरी दिलीप निघोट यांचे २००३ मध्ये निधन झाले. मुलं लहान असल्याने पत्नी विजया यांच्यावर आभाळ कोसळले. सासरे व लहान मुलांचा सांभाळ कसा करायचा, शेती कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला. परिवारापुढे आर्थिक संकट उभं झालं. दरम्यान, भाऊ अरुण उमरेडकर यांनी परिवाराला साथ दिली. जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला १ गाय, १ म्हशी घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. व्यवसाय वाढत असताना कोरोनाचे संकट आले. तेव्हा आपण गाई म्हशी विकून टाकल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा या व्यवसायात पडण्याचा विचार केला. पुन्हा एक म्हैस, एक गाय विकत घेतली. आज आपल्याकडे १३ गाइै, ४ म्हशी छोटे-मोठे वासलं २० असे ३० ते ३५ जनावरं आहेत. मामा अरुण उमरेडकर आणि मुलं अंकित आणि अक्षय या भावंडांनी दुग्धव्यवसायात यशस्वी पाऊल टाकत कुटुंबाच्या अर्थकारणाला नवी उभारी दिली असल्याचे विजया निघोट यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर समुद्रपूर बाजारपेठेतून पहिली एचएफ गाय खरेदी केली. या गाईचे एका वेळी १० लिटरप्रमाणे दोन्ही वेळेस मिळून २० लिटर दूध संकलित होऊ लागले. ४५ रुपये प्रति लिटर दराने दररोज ९०० रुपये म्हणजेच महिन्याला २७ हजार रुपये आणि वर्षाला जवळपास ४ लाख रुपयांचे उत्पन्न एका गाईच्या दुधातून मिळू लागले. त्यामुळे हिम्मत आली आणि पुढे म्हशी खरेदी केल्या.
आपण पुर्ण वेळ जनावरांच्याच सेवेत असतो. त्यांची पोटच्या मुलांसारखी काळजी घेतो. एका वेळेला अडीच किलो सुग्रास, त्यात गुळाचा खडा आणि थोडीशी खल्ली असा संतुलित आहार, वेळेवर चारापाणी, स्वच्छ गोठा आणि गाईंची घेतली जाणारी काळजी यामुळे दूध उत्पादनात सातत्य राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.लग्न शेतकरी कुटुंबात झाले होते. संसार व्यवस्थित सुरू असताना पतीचे निधन झाले. त्यानंतर आपल्यापुढे प्रश्न उभा झाला. मात्र, आपण खचलो नाही. मुलं, परिवाराला सांभाळून कॉन्व्हेंटमध्ये नोकरी, त्यानंतर शिकवणी सुरू केली. भाऊ अरुण उमरेडकर यांनी मला खूप साथ दिली तर परिवाराच्या सगळ्या लोकांची साथ हेच आपल्या यशस्वी दुग्ध व्यवसायाचे गणित असल्याचे विजया निघोट यांनी सांगितले.