देवळी,
accused-in-panchayat-samiti-scam-absconding देवळी पंचायत समितीमधील धडक सिंचन विहीर योजनेचा २३ लाख २० हजार ६ रुपयांचा शासकीय निधी हडप करणारा कृषी विस्तार अधिकारी दिनेश दखणे रा. उमरी (मेघे) याच्यावर देवळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरार असून त्याचा देवळी पोलिस कसून शोध घेत आहे.

देवळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे निवडणूक कामात व्यस्त असल्याची संधी साधून कृषी विस्तार अधिकारी दिनेश दखणे याने धडक सिंचन विहीर योजनेचा २३ लाख २० हजार ६ रुपये शासकीय निधी हडपला. दखणे याने स्टेट बँकेतून पंचायत समितीच्या खात्यातील स्वतःच्या नावे धनादेश वटवून अपहार केल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांनी देवळी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून दिनेश दखणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कारवाईच्या भीतीने निलंबित कृषी विस्तार अधिकारी दखणे पसार झाला. पोलिस निरीक्षक संदीप काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक फरार आरोपीचा शोध घेत असून आरोपीची पत्नी व पुतण्याला चौकशीकरिता बोलावल्याचे समजते.
देवळी पंचायत समितीचे लेखा विभाग, लेखापाल अंकित पारिसे यांनी १९ नोव्हेंबर रोजी या आर्थिक अनियमिततेची तक्रार दिली. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी पोलिसांत अर्ज सादर करण्यात आला. प्राथमिक चौकशीत पैशांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यावर २३ नोव्हेंबर रोजी चौकशी अहवाल व बँक वितरण पत्रासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. सोमन यांनी याप्रकरणी दखल घेऊन दखणे याला तत्काळ निलंबित केले असून निलंबित काळात पंचायत समिती समुद्रपूर येथे रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
चेकबुक गायब
शासकीय नियमानुसार आर्थिक रजिस्टर लेखाजोखा आणि बँकेचे चेकबुक लेखा विभाग व लेखापाल यांच्या ताब्यात असतात, असे असताना कृषी विस्तार अधिकारी दखणे याच्या हाती हे चेकबुक कसे लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे? या अपहार प्रकरणामध्ये दिनेश दखणे एकटेच आहे की, त्याच्यासोबत अजून कोणी सहभागी आहे, याबाबत चर्चा सुरू आहे.
स्वाक्षरी जुळली कशी?
कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी धनादेशावर देवळी गटविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय स्टेट बँकेचे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोटी स्वाक्षरी धनादेशावर असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.