गडचिरोलीच्या जंगलात 16-17 व्या शतकातील वीरगळांचा शोध

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
गडचिरोली,
forests-of-gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वारसा उजेडात आणणार्या संशोधन मोहिमेत कुरखेडा तालुक्यातील आंधळी गावाजवळ घनदाट जंगलात सोळाव्या अन् सतराव्या शतकातील सुमारे 50 वीरगळांचा शोध लागला आहे. पुरातत्त्व संशोधक डॉ. रघुनाथ बोरकर यांनी केलेल्या या शोधमोहिमेत नंदकिशोर नैताम आणि रमेश कोरचा सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या वीरगळांपैकी काही भग्नावस्थेत, तर काही सुस्थितीत असून ऊन, वारा आणि पावसाचा मारा सहन करीत आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
 
 
forests-of-gadchiroli
 
भारतीय लोकजीवनात रणांगणावर वीरमरण येणे हे पुण्यप्रद मानले जात असे. युद्धात मृत्यू आल्यास स्वर्गप्राप्ती, तर विजय मिळाल्यास राज्याचा उपभोग, अशी तत्कालीन योद्ध्यांची धारणा होती. अशा शूरवीरांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी त्यांच्या पराक्रमाचे चित्रण वीरगळ शिल्पांच्या माध्यमातून केले जात असे, अशी माहिती आहे. आंधळी येथील वीरगळांवर अश्‍वारूढ, गजारूढ तसेच पायदळ योद्ध्यांची शिल्पे कोरलेली आहेत. वीरासनातील द्विहस्त योद्ध्यांच्या एका हातात ढाल, तर दुसर्या हातात तलवार किंवा भाला दाखविण्यात आला आहे. काही शिल्पांमध्ये कमरेला कट्यार लावलेले योद्धे युद्धासाठी सज्ज असल्याचे दिसते.
 
 
योद्ध्यांचे पोशाख आणि अलंकार तत्कालीन युद्धसंस्कृतीची माहिती देतात. काही वीरगळांच्या वरच्या भागात चंद्र आणि सूर्य कोरलेले असून, योद्ध्यांची कीर्ती चंद्र-सूर्य असेपर्यंत अमर राहावी, हा त्यामागील भावार्थ असल्याचे दिसून येते. या शिल्पसमूहातील ‘कलशारोहण पूजन’ हे शिल्प विशेष लक्षवेधी आहे. कलशाच्या दोन्ही बाजूंना स्त्री आणि पुरुष बसून उदकपळीच्या माध्यमातून पूजन करीत असल्याचे चित्रण आहे.
 
 
योद्ध्याच्या मोक्षप्राप्तीसाठी केलेल्या पूजनाचे प्रतीक म्हणून या शिल्पाकडे पाहिले जाते. स्त्री-पुरुषांची अनोखी बैठकही अभ्यासकांचे लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे, या वीरगळांना कालांतराने ग्रामदेवतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आंधळी येथील आदिवासी बांधव आजही या शिल्पसमूहाची ग्रामदेवता म्हणून पूजा करतात.