वर्धा,
farmers-backs-rabi-crop-insurance जिल्ह्यात यंदा अल्प पर्जन्यमानामुळे खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामावरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने रबी पिकांच्या उत्पादनाबाबत चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळावे, यासाठी पीक विमा योजना महत्त्वाची असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १४५ शेतकऱ्यांनीच रबीसाठी पीकविम्याचे संरक्षण घेतले आहे.
जिल्ह्यात रबी हंगामातील पेरणीला वेग आला असून, उपलब्ध माहितीनुसार ५० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, मान्सून काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीतील ओलावा आणि सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक फटका बसू नये, यासाठी पीकविमा योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. मात्र, विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रबी हंगामातील विविध पिकांसाठी विमा संरक्षण घेण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. संत्रा पिकाचा विमा उतरविण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांनी मुदतीपूर्वी विमा अर्ज सादर करणे गरजेचे आहे. तसेच गहू आणि हरभरा पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत पीक विमा संरक्षण घेता येणार आहे.
पिकांना विम्याचे संरक्षण द्या : उपरीकर
यंदा अल्प पर्जन्यमानाचा रबी हंगामावरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रबी पिकांना विम्याचे संरक्षण द्यावे. १८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील केवळ १४५ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी दिली आहे.